‘नो सर्व्हिस, नो टॅक्स’ मोहिमेला पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2021 01:04 AM2021-02-02T01:04:58+5:302021-02-02T01:05:32+5:30
खारघर परिसरात आजही रस्ते, पाणी आदी प्राथमिक सुविधा सिडको प्रशासनाकडून दिल्या जात असताना मालमत्ता कराच्या रूपाने पालिकेला अवाढव्य टॅक्स येथील नागरिकांनी का द्यावा?
पनवेल - खारघर परिसरात आजही रस्ते, पाणी आदी प्राथमिक सुविधा सिडको प्रशासनाकडून दिल्या जात असताना मालमत्ता कराच्या रूपाने पालिकेला अवाढव्य टॅक्स येथील नागरिकांनी का द्यावा? सिडकोकडे येथील नागरिक सेवा कर जमा करत असताना केवळ कचरा उचलण्याच्या कामासाठी मागील चार वर्षांचा मालमत्ता कर का भरावा, असा प्रश्न खारघर येथे रविवारी पार पडलेल्या बैठकीत नागरिकांनी उपस्थित केला.
महाविकास आघाडीच्या वतीने मालमत्ता करासंदर्भात येथील रहिवाशांचे अभिप्राय घेण्यात आले. या वेळी आमदार बाळाराम पाटील, स्थानिक प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष बबनदादा पाटील, काँग्रेसचे आर. सी. घरत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पनवेल जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील, नगरसेवक गुरुनाथ गायकर, माजी जिल्हा परिषद सदस्य रामचंद्र करावकर आदी उपस्थित होते. खारघर परिसरात लवकरच मालमत्ता कराच्या नोटीस येणार असल्याची माहिती प्राप्त होताच महाविकास आघाडीच्या वतीने खारघरमध्ये रविवार मालमत्ता करासंदर्भात खुल्या चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. सिडकोकडून खारघरमध्ये केवळ साठ टक्के विकासकामे झाली आहेत. अजूनही अनेक नोड अविकसित आहेत. आजही नागरिक सिडकोकडे सेवा कर भरणा करतात. पालिका केवळ कचरा उचलण्याचे काम करीत असून कोणत्या आधारावर चार वर्षांच्या मालमत्ता कराची नोटीस पाठवीत आहे.
सत्ताधिकारी केवळ मूग गिळून बसले आहेत, असा आरोप या वेळी सत्ताधिकाऱ्यांवर करण्यात आला. पालिका नागरी सुविधांचे काम करण्याऐवजी मालमत्ता कराची मागणी करून नागरिकांवर अन्याय करीत आहे. खारघरवासी हे सहन करणार नाहीत, असा इशारा दिला. पालिका हद्दीत मालमत्ता कराची नोटीस पाठवून पालिका केवळ शिदोरी गोळा करण्याचे काम करीत असेल तर पालिकेच्या विरोधात लवकरच भव्य मोर्चा काढण्याचा इशारा आमदार बाळाराम पाटील यांनी दिला.
खुली चर्चा यशस्वी करण्यासाठी आघाडीचे पदाधिकारी, नगरसेवक गुरुनाथ गायकर, बी. ए. पाटील, कॅप्टन एच. एस. कलावत, संतोष गायकर, रामचंद्र देवरे यांनी मेहनत घेतली. या खुल्या चर्चेत खारघरमधील नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
खारघर परिसरात लवकरच मालमत्ता कराच्या नोटीस येणार असल्याची माहिती प्राप्त होताच महाविकास आघाडीच्या वतीने खारघरमध्ये रविवार मालमत्ता करासंदर्भात खुल्या चर्चेचे आयोजन करण्यात आले होते.