- नारायण जाधव नवी मुंबई - मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी माथाडी कामगारांच्या आवाहनानुसार शुक्रवारी मुंबई बाजार समितीमधील भाजीपाला आणि फळ मार्केट वगळता इतर तीन मार्केटमधील व्यवहार बंद ठेवले होते. यामुळे बाजार आवारात शुकशुकाट होता.
दिवाळीच्या तोंडावर हा संप पुकारल्याने सुका मेवा, तसेच फराळाचे पदार्थ विक्री, आकाशदिवे, सजावटसाहित्य, विद्युत रोषणाई यांचे ठोक व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले होते. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर लढा सुरू आहे. प्रत्येक गावामधील नागरिक आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत. महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनमधील माथाडी कामगारांनीही माथाडी नेते नरेंद्र पाटील आणि आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी मार्केट बंद ठेवून या आंदोलनाला पाठिंबा दिला.
मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये माथाडी संघटनेचे मोठे योगदान आहे. २२ मार्च १९८२ मध्ये संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली विधान भवनावर मोर्चा काढला होता. सरकारने आरक्षण न दिल्यामुळे २३ मार्चला अण्णासाहेबांनी आरक्षणासाठी हौतात्म्य पत्करले होते. तेव्हापासून आरक्षणासाठी कामगार पाठपुरावा करीत असून, राज्यात सध्या सुरू असलेल्या आंदोलनामध्येही सहभागी होऊन माथाडींनी शुक्रवारी बंद पाळला.