पोलीसपुत्रांनी कुटुंबाचा भार उचलल्याने मिळणार आधार; १९ जणांना नियुक्तीपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 11:45 PM2021-02-22T23:45:33+5:302021-02-22T23:45:48+5:30
१९ जणांना नियुक्तीपत्र
सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील १९ शहिदांच्या परिवारातील सदस्यांना पोलीस दलात समाविष्ट करून घेतले जाणार आहे. त्यात ५ महिलांचा समावेश असून, घरातील प्रमुख व्यक्तीच्या निधनानंतर त्या कुटुंबासाठी पुढे आल्या आहेत. त्यात उच्चशिक्षित पोलीसपुत्रांचाही समावेश आहे.
गतवर्षी लॉकडाऊनच्या कालावधीत राज्यातील पोलिसांवर महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. या कालावधीत स्वतःला कोरोनापासून सुरक्षित ठेवत नागरिकांच्या सुरक्षेची भूमिका पोलीस निभावत होते, परंतु कर्तव्य बजावताना झालेल्या संसर्गामुळे नवी मुंबई पोलीस दलातील एक हजाराहून अधिक पोलीस व त्यांचे कुटुंबीय कोरोनाबाधित झाले होते. त्यापैकी १० पोलिसांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्य शासनाने त्यांना कोविड योद्ध्यांचा दर्जा दिला. मात्र, कुटुंबातील प्रमुख व्यक्ती केल्यामुळे कधी न भरून निघणारी पोकळी या कुटुंबात झाली होती. अशातच शहिदांच्या वारसांना अनुकंप तत्त्वावर पोलीस दलात घेण्याचा निर्णयाने अनेक कटुंबांना आधार मिळाला आहे.
त्यानुसार, वडील अथवा पतीच्या जागी पोलीस दलात नोकरी करण्यासाठी १९ वारसदार पुढे आले आहेत. त्यात शहीद हवालदार अविनाश दडेकर यांच्या पत्नी रूपाली दडेकर यांच्यासह ५ पोलीस कन्यांचा समावेश आहे. महिला पोलीस शिपाईपदावर त्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्याशिवाय १४ पोलीसपुत्र पोलीस शिपाईपदाच्या भरतीला तयार झाले आहेत. त्यांना पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांच्या हस्ते मंगळवारी नियुक्तिपत्र दिले जाणार आहे.
अनुकंपा तत्त्वावर होणाऱ्या या भरतीत मुलांमध्येही अनेक जण उच्चशिक्षित आहेत. त्यापैकी विशाल रवींद्र पाटील हा बीएससी आयटीच्या अंतिम वर्षाला आहे. त्याचे सैन्यात जाऊन देशसेवा करण्याचे स्वप्न होते. या स्वप्नपूर्तीसाठी तो यापूर्वी सैन्य भरतीत उतरलाही होता. मात्र, वडिलांच्या निधनानंतर आईला आधाराची गरज भासल्याने त्याने वडिलांच्या जागी पोलीस होण्याची तयारी दाखविली.
शिक्षण पूर्ण केल्यावर करायची होती नोकरी
नियुक्तिपत्र स्वीकारणाऱ्यांमध्ये सरस्वती राजेंद्र खोत हिचाही समावेश आहे. ती बीएससीच्या अंतिम वर्षाला असून, शिक्षण पूर्ण केल्यानंतर पोलीस अधिकारी होण्याचे तिचे स्वप्न होते, परंतु कोरोनामुळे वडिलांच्या निधनानंतर आई व लहान भावाची जबाबदारी तिच्यावर आली आहे. त्यानुसार, पोलीस होऊन कुटुंबाचा आधार बनण्याचा निर्णय तिने घेतला आहे.