सागरी किनारा रस्त्यालगतच्या भराव भूमीमध्ये विविध नागरी सेवा सुविधा उभारण्यासंदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने महानगरपालिकेच्या बाजूने निकाल दिला आहे. या निकालाबाबत समाधान व्यक्त करीत बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी या निर्णयामुळे 'सागरी किनारा रस्ता' (मुंबई कोस्टल रोड) हा प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
यासंदर्भात अधिक माहिती देताना सागरी किनारा रस्ता प्रकल्पाचे मुख्य अभियंता (प्रभारी) मंतय्या स्वामी यांनी सांगितले की, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ.इकबाल सिंह चहल व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त श्रीमती आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनानुसार सागरी किनारा रस्ता प्रकल्पाचे बांधकाम सध्या प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक त्या विविध परवानग्या यापूर्वीच प्राप्त झाल्या आहेत. तथापि, या अनुषंगाने उच्च न्यायालयात विविध संस्थांद्वारे याचिका दाखल करण्यात आल्या होती. सागरी किनारा रस्त्यास प्राप्त झालेल्या विविध परवानग्या या केवळ रस्त्यासाठी असून इतर नागरी सेवा सुविधांसाठी नाहीत, असा मुद्दा या याचिकांमध्ये होता. याबाबत यापूर्वीच्या निकालाच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाद्वारे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बाजूने निकाल देण्यात आल्याने आता सागरी किनारा रस्ता प्रकल्पांतर्गत विविध लोकोपयोगी सुविधा उभारण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे.
यासंदर्भात अधिक माहिती देताना स्वामी यांनी सांगितले की, बृहन्मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणाऱ्या आणि मुंबईकर नागरिकांसाठी बहुऱ्उपयोगी ठरणाऱ्या प्रस्तावित सागरी किनारा रस्त्यासाठी (कोस्टल रोड) उपलब्ध होणाऱ्या भराव क्षेत्रापैकी २५ ते ३० टक्के क्षेत्रात सागरी किनारा रस्त्याचे बांधकाम करण्यात येणार आहे. तर उर्वरित सुमारे ७० ते ७५ टक्के क्षेत्रात म्हणजेच ७५ लाख ३१ हजार ५२५ चौरस फूट परिसराचा उपयोग हा लॅडस्केपिंगसह विविध नागरी सुविधांसाठी करण्यात येणार आहे. ज्यामध्ये प्रसाधन गृह, जॉगिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक, फुलपाखरु उद्यान, सागरी पदपथ, खुले नाट्यगृह, लहान मुलांसाठीची उद्याने व खेळाची मैदाने, पोलीस चौकी, बस थांबे, रस्ता ओलांडण्यासाठी भूमीगत पदपथ, जेट्टी इत्यादींचा समावेश असणार आहे. याव्यतिरिक्त १ हजार ८५६ एवढी वाहन क्षमता असलेल्या ३ भूमीगत वाहनतळांचाही यात समावेश असणार आहे. यात 'लॅण्डस्केपिंग' प्रत्यक्ष स्वरुपात आकारास येण्यापूर्वी ते अधिकाधिक सुविधापूर्ण करण्याच्या दृष्टीने नागरिकांकडून सूचना मागविण्यात येणार आहेत, अशीही प्रमुख अभियंता स्वामी यांनी दिली आहे.
मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्पांतर्गत 'लॅण्डस्केप' व संबंधित कामांची माहिती देताना स्वामी यांनी सांगितले की, या प्रकल्पासाठी १ कोटी ३ लाख ८३ हजार ८२० चौरस फुटांचे भराव क्षेत्र उपलब्ध होणार आहे. यापैकी सुमारे २५ ते ३० टक्के क्षेत्रात म्हणजेच २८ लाख ५२ हजार २९५ चौरस फुटांमध्ये सागरी किनारा रस्त्याचे बांधकाम करण्यात येणार आहे. तर उर्वरित ७० ते ७५ टक्के जागेत म्हणजेच ७५ लाख ३१ हजार ५२५ चौरस फुटांमध्ये नागरी सुविधा उभारण्यात येणार आहेत.
दक्षिण मुंबईतील श्यामलदास गांधी उड्डाणपूल (प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर) ते राजीव गांधी सागरी सेतूच्या (वरळी वांद्रे सी लिंक) वरळी बाजुच्या दरम्यान 'मुंबई सागरी किनारा रस्ता' बांधण्याची कार्यवाही सातत्याने प्रगतीपथावर आहे. या सागरी किनारा रस्त्यासाठी उपलब्ध होणाऱ्या एकूण भराव क्षेत्रापैकी ७० ते ७५ टक्के जागेत म्हणजेच ७५ लाख ३१ हजार ५२५ चौरस फुटांमध्ये उभारण्यात येणाऱ्या विविध नागरी सुविधांबाबत मुद्देनिहाय माहिती पुढीलप्रमाणे आहे
३ भूमीगत वाहनतळ:प्रस्तावित सागरी किनारा रस्त्यालगत असणाऱ्या धार्मिक स्थळांना व पर्यटन स्थळांना नागरिक मोठ्या संख्येने भेट देत असतात. हे लक्षात घेऊन, या स्थळांच्या जवळच्या परिसरात ३ मोठी भूमीगत वाहनतळे उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. यापैकी एक वाहनतळ हे महालक्ष्मी मंदिर व हाजीअली दर्गा यांच्या जवळ असणार आहे. दुसरे वाहनतळ हे 'अमर सन्स गार्डन' जवळ असणार आहे. तर मोठ्या प्रमाणात शालेय सहली येणाऱ्या वरळी डेअरी व वरळी सीफेस येथे तिसरे वाहनतळ उभारण्यात येणार आहे. या तिन्ही वाहनतळांची एकूण वाहनक्षमता ही १ हजार ८५६ एवढी असणार आहे. विशेष म्हणजे हे तिन्ही वाहनतळ भूमीगत असणार असून त्यांच्या छतावरती उद्यान वा खेळाचे मैदान विकसित करण्याचेही प्रस्तावित करण्यात आले आहे.
फुलपाखरु उद्यान -सागरी किनारा रस्त्याची उभारणी करण्यासाठी विविध शासकीय संस्थांची मंजूरी आवश्यक असते. यामध्ये केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाची परवानगी ही एक महत्त्वाची परवानगी आहे. मुंबई सागरी किनारा रस्ता उभारण्यासाठी ही परवानगी यापूर्वीच प्राप्त झाली आहे. तथापि, ही परवानगी देताना केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाने 'बॉटॅनिकल बटरफ्लाय गार्डन' उभारण्याची अट घातलेली आहे. त्यानुसार उपलब्ध होणाऱ्या भराव क्षेत्रामध्ये बृहन्मुंबई महापालिकेद्वारे एक 'फुलपाखरु उद्यान' विकसित करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक ती आर्थिक तरतूद देखील महापालिकेद्वारे करण्यात येत आहे.
जॉगिंग ट्रॅक व सायकल ट्रॅक -आजच्या धावपळीच्या व धकाधकीच्या जीवनात आणि बदलत्या जीवनशैलीमध्ये आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी नियमित व्यायामाची आवश्यकता असते. हे लक्षात घेऊन सागरी किनारा रस्त्यालगत स्वतंत्र 'जॉगिंग ट्रॅक' व 'सायकल ट्रॅक' उभारण्याचे प्रस्तावित करण्यात येत आहे.
सागरी पदपथ (Promenade) -नेताजी सुभाष मार्ग (मरीन ड्राईव्ह) व खान अब्दुल गफार खान मार्ग या दोन्ही ठिकाणी बृहन्मुंबई महापालिकेद्वारे बसण्याची सुविधा असणाऱ्या कट्ट्यांसह सागरी पदपथ तयार करण्यात आले आहेत. याच धर्तीवर सागरी किनारा रस्त्यालगत प्रस्तावित असणारा 'समुद्री पदपथ' (Promenade) हा मुंबईतील सर्वात मोठा 'समुद्री पदपथ' ठरणार असून तो सुमारे २० मीटर रुंद व साधारणपणे ७.५ किलोमीटर लांबीचा असणार आहे. हा पदपथ समुद्राला जोडून व 'कोस्टल रोड'लगत बांधला जाणार असून तो प्रियदर्शनी पार्क ते वरळी वांद्रे सीऱ्लिंक दरम्यान असणार आहे. याशिवाय, उद्याने व खेळांची मैदाने, बसथांबे व भूमिगत पदपथ, प्रसाधन गृह, खुले नाट्यगृह, आदींचाही यात समावेश आहे.