नवी मुंबई - गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसला मोठ्या प्रमाणावर गळती लागली आहे. अनेक दिग्गज नेते आपल्या वारसांसह पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपा आणि शिवसेनेची वाट धरत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे पक्ष सोडून जाणाऱ्यांवर टीका केली आहे. नवी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी 'वंशाच्या दिव्यापेक्षा मुलीच बऱ्या असे वक्तव्य केले आहे. दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे उलट सुलट चर्चांना जोर आला आहे. आज नवी मुंबईत आलेल्या सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी पक्ष सोडून चाललेली नेतेमंडळी आणि भाजपावर जोरदार टीका केली. 'वंशाच्या दिव्यापेक्षा मुलीच बऱ्या', असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले. दरम्यान, सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्याचा रोख सध्या भाजपाच्या वाटेवर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबईतील बडे नेते गणेश नाईक आणि त्यांच्या पुत्राकडे असल्याची चर्चा आहे.यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून मोठ्या प्रमाणावर इनकमिंग करवून घेत असलेल्या भाजपावरही सुप्रिया सुळे यांनी टीका केली. कॉंग्रेस मुक्त भारत करणारा भाजपा आता पक्षात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना पक्षात प्रवेश देत आहे. त्यामुळे भाजप हा कॉंग्रेस युक्त पक्ष झाला आहे. भाजपने पक्षाचे नाव बदलून कॉंग्रेस जनता पार्टी करावे, असा टोलाही त्यांनी लगावला. दरम्यान, मागील 40-40 वर्षे एका पक्षाशी निष्ठा ठेवल्यानंतर केवळ पुत्र प्रेमासाठी आणि त्याच्या स्वार्थासाठी नेते दुसऱ्या पक्षात जात आहेत. परंतु, जात असतांना दुसऱ्या पक्षाच्या काल परवा झालेल्या नेत्यांपुढे मुजरा करावा लागतो, ही अतिशय दुर्देवाची गोष्ट असल्याची टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी ठाण्यात केली होती. आम्ही वंशाच्या दिवा नसलो तरी आम्ही स्वाभिमानी असून आम्ही आमच्या वडिलांना आमच्या स्वार्थासाठी कुणापुढेही मुजरा करायला लावत नाही, असे सांगत त्यांनी राष्ट्रवादीतून भाजप व शिवसेनेत जाणाऱ्या राष्ट्रवादीच्या जेष्ठ नेत्यांना टोला लगावला होता.
वंशाच्या दिव्यापेक्षा मुली बऱ्या, सुप्रिया सुळे यांचा वक्तव्याने उलटसुलट चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2019 12:36 PM