प्रदूषण नियंत्रणासाठी वापरणार 'नोटा'चा सोटा; कोपरीकर झाले आक्रमक
By कमलाकर कांबळे | Published: November 6, 2023 05:28 PM2023-11-06T17:28:48+5:302023-11-06T17:29:04+5:30
स्वच्छ हवा हा माझा अधिकार अभियान
नवी मुंबई : मागील काही दिवसांपासून नवी मुंबईतील प्रदूषणात वाढ झाली आहे. विशेषत: वायू प्रदूषणामुळे रहिवासी हैराण झाले आहेत. त्यामुळे कोपरी आणि परिसरातील रहिवाशांनी स्वच्छ हवा हा माझा अधिकार, हे अभियान छेडले आहे. याअंतर्गत प्रत्येक रविवारी एक तास ठिय्या आंदोलन करून संबंधित प्रशासनाचे या समस्येकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यानंतरही प्रशासनाकडून यासंदर्भात कोणतीही कारवाई होत नसल्याने संतप्त रहिवाशांनी येत्या निवडणुकीत नोटाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.
वाढत्या प्रदूषणाच्या विरोधात वाशी सेक्टर २६, २८ कोपरीगाव तसेच कोपरखैरणे सेक्टर ११ या परिसरातील नागरिकांनी हे आंदोलन छेडले आहे. याअंतर्गत सेक्टर २६ येथील चिंतामणी चौकात सलग पाचव्या रविवारी ठिय्या आंदोलन केले. प्रदूषणाचा प्रश्न सोडविण्यास संबंधित प्रशासनाला सपशेल अपयश आले आहे. प्रशासनाच्या निष्क्रियतेचा उपस्थितांनी यावेळी निषेध करून आगामी निवडणुकीत नोटाचा वापर करण्याचा निर्णय घेतला.
पाच हजार कोटींचे बजेट काय कामाचे
जवळपास पाच हजार कोटींचे अंदाजपत्रक असलेल्या महापालिकेला प्रदूषणाच्या विषयावर गंभीर नसल्याचा आरोप यावेळी रहिवाशांनी केला आहे. त्यामुळे या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नवी मुंबई विकास अधिष्ठान या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संकेत नारायण डोके यांनी दिला आहे.
प्रदूषण रोखण्यासाठी सहा कलमी प्रस्ताव
प्रदूषण नियंत्रणाच्या दृष्टीने रविवारी झालेल्या ठिय्या आंदोलनप्रसंगी नागरिकांनी सहा मागण्या केल्या आहेत. नागरी वस्तीला अनुसरून बफर झोन क्षेत्र निश्चित करावे. बफर झोनमध्ये येणाऱ्या औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कंपन्यांचे स्थलांतर करावे.
तुर्भे एपीएमसी परिसरात प्रत्येक पाचशे मीटर अंतरावर कायमस्वरूपी धूळक्षमण यंत्र बसवावे. कोपरीगाव व कोपरखैरणे सेक्टर ११ शेजारील नाला बंदिस्त करावा. वाशी सेक्टर २६, २८ तसेच कोपरीगाव आणि कोपरखैरणे सेक्टर ११ प्रदूषणाच्या बाबतीत अतिदक्षता परिसर म्हणून घोषित करावा. रेल्वे मार्गालगत असलेल्या निवासी इमारतींजवळ सुरू असलेली बांधकाम साहित्यांची विक्री थांबवावी या मागण्यांचा यात समावेश आहे.