धाकले आयलंडवर नवी मुंबई विमानतळाची निरीक्षण रडार यंत्रणा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 08:53 AM2023-12-21T08:53:16+5:302023-12-21T08:53:42+5:30

सिडकोने कंबर कसली : सीआरझेड प्राधिकरणाने दिली परवानगी

Surveillance radar system of Navi Mumbai Airport on Dhakale Island | धाकले आयलंडवर नवी मुंबई विमानतळाची निरीक्षण रडार यंत्रणा

धाकले आयलंडवर नवी मुंबई विमानतळाची निरीक्षण रडार यंत्रणा

- नारायण जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : कोणत्याही परिस्थितीत डिसेंबर २०२४ पर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानोड्डाण करण्याचा संकल्प राज्य सरकारने केला आहे. त्यादृष्टीने सिडको आणि विकास कंपनी अदानी समुहाने युद्धपातळीवर कामे सुरू केली आहेत. आता बेलापूरनजीकच्या शहाबाज येथील धाकले आयलंडवर जून २०२४ पर्यंत निरीक्षण रडार यंत्रणा बसविण्यात येणार आहे.

विमानतळावर ये-जा करणाऱ्या सर्व प्रकारच्या विमानांच्या संचालनासाठी अत्यावश्यक असलेली ही रडार यंत्रणा आहे. ती बसविण्यासाठी आता हालचाली सुरू झाल्या असून, सीआरझेड प्राधिकरणाने हिरवा कंदील दाखवला आहे. याबाबतचा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाकडे पाठविला आहे.

...ही कामे करणार
    रडारसाठी लागणारी जागा - ५० बाय ५० मीटर अर्थात ०.५० हेक्टर 
    जेटी - ४५ मीटर बाय १५ मीटर
    जेटीला जोडणारा रस्ता - १२१ मीटर बाय ८ मीटर
    जेटीचा अंतर्गत रस्ता : २७ बाय आठ मीटर
    याशिवाय मलबार शिपयार्डपर्यंत हे आयलंड रस्त्याने जोडण्यात येणार आहे.

६० दशलक्ष प्रवासी 
ये-जा करण्याचा अंदाज

भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या देखरेखीखाली ही कामे केली जाणार आहेत. विमानतळ प्राधिकरणाच्या अंदाजानुसार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर येथे प्रवासी प्रतिवर्षी ६० दशलक्ष प्रवासी ये - जा करतील, असा अंदाज आहे. त्यानुसार विमानांचे किमान ३ नॉटिकल मैलावर उच्च तीव्रतेच्या धावपट्टीच्या ऑपरेशनसाठी रडार यंत्रणा बसविण्याची योजना आहे.
यासाठी प्राधिकरणाने विमानांच्या चोख संचालनासाठी किमान ३ विमानतळ सर्वेक्षण रडार प्रणाली बसविण्यासाठी योजना आखली आहे. त्यापैकी पहिले रडार जून २०२४ पर्यंत बसविण्यात येणार आहे, जेणेकरून त्याची तपासणी आणि चाचणी करून येथून ये-जा करणाऱ्या सर्व प्रकारच्या विमानांचे निरीक्षण करणे सोपे होईल.

धाकले आयलंडचीच जागा का निवडली ? 
धाकले आयलंड पनवेल खाडीने वेढलेले आहे. बेलापूरची महागाव जेटी आणि सीवूड टर्मिनल येथून जवळच असून, येथून सहज ये-जा करता येणार आहे. परिसरात कोणतीही मानवी वस्ती आणि विकासकामे सुरू नाहीत. रडार यंत्रणा बसविण्यासाठी ०.५३१५ हेक्टर खारफुटीसह ६० झाडांची कत्तल करावी लागणार आहे.

Web Title: Surveillance radar system of Navi Mumbai Airport on Dhakale Island

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.