झोपडपट्टी पुनर्वसनासाठी चिंचपाडापासून सर्वेक्षण; २१ सप्टेंबरला होणार सुरूवात
By नामदेव मोरे | Published: September 18, 2023 07:16 PM2023-09-18T19:16:26+5:302023-09-18T19:16:53+5:30
एसआरएच्या माध्यमातून कागदपत्रांची होणार पडताळणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : नवी मुंबईमधील झोपडपट्टीवासीयांना पक्की घरे मिळवून देण्यासाठी शासनाने एसआरए योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शहरातील झोपडपट्टीवासीयांचे सर्वेक्षण चिंचपाडापासून करण्यात येणार आहे. २१ सप्टेंबरला सर्वेक्षण सुरू केले जाणार असून एसआरए चे कर्मचारी कागदपत्रांची पडताळणी करणार आहेत.
नवी मुंबईमध्ये दिघा ते बेलापूर दरम्यान एमआयडीसीत व डोंगराच्या पायथ्याशी झोपडपट्टी परिसर आहे. झोपडपट्टीमधील नागरिकांना पक्की घरे मिळावीत यासाठी एसआरए योजना राबविण्यात यावी अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले व पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. या मागणीला शासनाने मंजूरी दिली असून पुढील कार्यवाही सुरू केली आहे. महानगरपालिका क्षेत्रामधील झोपड्यांचे व रहिवाशांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. ऐरोली विभागामधील चिंचपाडा झोपडपट्टीपासून २१ सप्टेंबरला हे सर्वेक्षण सुरू होणार आहे. जानेवारी २००० किंवा त्यापुर्वीपासून संरक्षणप्राप्त असल्याचे ठरविण्यासाठी व प्रत्यक्षात राहणाऱ्या झोपडीवासीयांचा निवारा निश्चीत करण्याचे काम केले जाणार आहे. सर्वेक्षण पथकाकडून झोपडी क्रमांक देण्यात आलेल्या झोपड्यांचे मोजमाप, झोपडीधारकांच्या घरोघरी जाऊन संबंधित कुटुंबप्रमुख यांचे बायोमेट्रीक टेक्नोलॉजीद्वारे अंगठ्याचा ठसा व फोटो व झोपडीसमोर झोपडीधारकांच्या कुटुंबाचे फोटो घेण्यात येणार आहेत. रहिवशांकडून वास्तव्याचे पुरावे संकलीत केले जाणार आहेत. हे सर्वेक्षण झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत केले जात असून त्यास सहकार्य करण्याचे आवाहन मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण ठाणे १ च्या माध्यमातून केले आहे.
मुंबईच्या धर्तीवर नवी मुंबईमधील झोपडपट्टीधारकांना पक्की घरे मिळावी अशी रहिवाशांची मागणी होती. यासाठी लोकप्रतिनिधींनीही पाठपुरावा केला होता. या मागणीची दखल शासनाने घेतली असून पुढील कार्यवाही सुरू केली आहे. प्रत्यक्षात सर्वेक्षण सुरू होत असल्यामुळे रहिवाशांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील सर्वे झोपडपट्टी परिसराचे सर्वेक्षण केले जाणार आहे.
नवी मुंबईमधील झोपडपट्टी क्षेत्रामध्ये प्रथमच चिंचपाडा येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या माध्यमातून बायोमेट्रीक सर्वेक्षण सुरू केले जाणार आहे. यासाठी सर्व रहिवाशांच्यावतीने आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत यांचे आभारी आहोत
- विजय चौगुले - शिवसेना जिल्हा प्रमुख नवी मुंबई