फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणात पालिकेचा सावळा गोंधळ, परवानाधारकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 03:52 AM2017-11-26T03:52:29+5:302017-11-26T03:52:47+5:30
फेरीवाल्यांच्या संदर्भात पालिकेच्या दुटप्पी भूमिकेमुळे परवानाधारक फेरीवाल्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. एकीकडे सर्वेक्षण होणार असल्याचे सांगत असताना, दुसरीकडे मात्र परवानाधारक फेरीवाल्यांवरच कारवाईचा धडाका सुरू आहे.
नवी मुंबई : फेरीवाल्यांच्या संदर्भात पालिकेच्या दुटप्पी भूमिकेमुळे परवानाधारक फेरीवाल्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. एकीकडे सर्वेक्षण होणार असल्याचे सांगत असताना, दुसरीकडे मात्र परवानाधारक फेरीवाल्यांवरच कारवाईचा धडाका सुरू आहे. त्यामुळे फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणात सावळागोंधळ सुरू असून मर्जीतल्या फेरीवाल्यांना लाभार्थी करण्यासाठी हा प्रकार होत आहे.
पालिकेतर्फे सध्या फेरीवाल्यांचे सर्वेक्षण सुरू आहे. उपलब्ध मार्केटमध्ये फेरीवाल्यांना स्थान देण्यापूर्वी हे सर्वेक्षण करून पात्र फेरीवाल्यांना परवाना मिळणार आहेत. यामुळे पूर्वी ज्यांना पालिकेने परवाने दिले होते त्यांच्या आशा निर्माण झाल्या. पालिकेचा परवाना असताना त्यांना मार्केटमध्ये जागा देण्यापासून डावलले जात होते.
शुक्रवारी कोपरखैरणेच्या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई झाली. त्यात परवानाधारक फेरीवाल्यांच्या हातगाड्या व टपºयांची तोडफोड करण्यात आली असल्याचे श्याम कांबळे यांचे म्हणणे आहे. कांबळे यांच्या पत्नीच्या नावे फेरीवाला परवाना असून कोपरखैरणे सेक्टर ८ येथील फेरीवाला भूखंडावर अनेक वर्षांपासून ते व्यवसाय करत आहेत.
सदर भूखंडावर अद्ययावत मार्केट उभारणीच्या बहाण्याने तिथल्या सर्वच फेरीवाल्यांना बाहेर काढले होते. यानंतर एक वर्षापासून इमारत बांधून तयार असतानाही फेरीवाल्यांनी पदपथावर व्यवसाय मांडला. दोन दिवसांपूर्वी तेथे पालिकेतर्फे सर्वेक्षण होणार असल्याची नोटीस लावली. यामुळे लवकरच मार्केटमध्ये हक्काची जागा मिळणार या आनंदात फेरीवाले असतानाच कारवाई झाली आहे. यामध्ये १५ ते २० परवानाधारक फेरीवाल्यांच्या टपºया व हातगाड्यांची तोडफोड करण्यात आली. पालिकेच्या या दुटप्पी भूमिकेबाबत संताप व्यक्त करत सर्वेक्षणात सावळागोंधळ असल्याचा आरोप कांबळे यांनी केला. तर अपंग असल्याकारणाने उदरनिर्वाहासाठी परवाना घेऊन सुरू केलेला व्यवसाय उद्ध्वस्त झाल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याचा संताप चंद्रकांत धनावडे यांनी व्यक्त केला. या कारवाईमागे कटकारस्थान असून अधिकाºयांच्या मर्जीतल्या अनधिकृत फेरीवाल्यांना पालिकेचे ‘लाभार्थी‘ बनवण्यासाठी हा प्रकार सुरू असल्याचा आरोप कांबळेंनी केला. परवाना असतानाही पालिकेच्या अधिकाºयांनी केलेल्या कारवाईविरोधात ते पोलिसांकडेही तक्रार करण्यासाठी गेले होते. वेळोवेळी पालिकेचे शुल्क भरूनही झालेल्या कारवाईमुळे प्रशासनाकडून आपली फसवणूक झाल्याचा त्यांचा आरोप आहे. मात्र, पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार देऊन पिटाळून लावल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे; परंतु यासंदर्भात विभाग अधिकारी अशोक मढवी यांच्याशी संपर्क साधला असता तो झाला नाही.