नवी मुंबई : महसूल यंत्रणेसोबत इतर विभागांच्या मदतीने कोकण विभागात मराठा आरक्षणाचे सर्वेक्षण शंभर टक्के पूर्ण झाल्याची माहिती कोकण विभागीय महसूल आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिली आहे. या सर्वेक्षणात संकलीत केलेली माहिती मागासवर्ग आयोगाकडे सादर करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याची मोहीम हाती घेतली होती.
२३ जानेवारी पासून सुरु झालेल्या या मोहीमेत महसूल यंत्रणेसह इतर विभागांचे अधिकारी कर्मचारी सहभागी होते. अंगणवाडी सेविका, माध्यमिक आणि प्राथमिक शाळेचे शिक्षक, महानगरपालिकेचे कर्मचारी, असे जवळपास साडेचार लाख प्रगनक महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या नियंत्रणात या मोहीमेसाठी राज्यभर काम करत होते. तर २०० हून अधिक डेटाबेस सेंटर सुरू होते. सर्वेक्षणासाठी खास सॉफ्टवेअरही तयार करण्यात आले होते. २ फेब्रुवारीला मध्यरात्री बारा वाजता हे सर्वेक्षण संपले असून, कोकण विभागातील सर्व जिल्ह्यात सर्वेक्षणाचे हे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. या सर्वेक्षणात संकलीत केलेली माहिती मागासवर्ग आयोगाकडे सादर करण्यात येईल. यावरून अहवाल तयार करून तो शासनाकडे सादर करण्यात येईल, असे डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी स्पष्ट केले आहे.