नवी मुंबई : विमानतळबाधीतांच्या पुनर्वसनासाठी सिडकोच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यांना विविध प्रकारचे शैक्षणिक व व्यवसायिक प्रशिक्षण दिले जात आहे. त्यासाठी सिडको तारा या विशेष केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. त्यामाध्यमातून विमानतळबाधित दिव्यांग व्यक्तिंची सर्वेक्षण करण्यात आले असून त्यांची वैद्यकीय, शैक्षणिक व व्यवसायिक मूल्यांकन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.विमानतळ प्रकल्पग्रस्तांचा सर्वांगीण विकास करताना कोणताही घटक मागे राहू नये, अशी सिडकोची भूमिका आहे. त्यानुसार प्रकल्पग्रस्त दिव्यांग व्यक्तिंनाही मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर सर्वेक्षण केलेल्या दिव्यांग व्यक्तिंचे व्यवसायिक, वैद्यकीय व शैक्षणिक मूल्यांकन करण्यात आले. वाशी येथील ईटीसी केंद्रात ही मूल्यांकन प्रक्रिया पार पडली. दरम्यान, सिडको तारा केंद्राच्या माध्यमातून जुलै २0१६ मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणात एकूण ७७ प्रकल्पग्रस्त दिव्यांग व्यक्ती आढळून आल्या होत्या. त्यांना आरोग्य, कौशल्याधारित प्रशिक्षण, शैक्षणिक व व्यवसायिक मार्गदर्शन करण्यासाठी महापालिकेच्या ईटीसी केंद्राची मदत घेण्यात आली होती. त्यापैकी ४४ प्रकल्पबाधित दिव्यांग व्यक्तिंचे मूल्यांकन करण्यात आले. या मूल्यांकनाच्या अधारे या व्यक्तींना कोणत्या प्रकारचे मार्गदर्शन व मदत करता येईल, याचा अहवाल ईटीसी केंद्राकडून मागविण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या विकासासाठी पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सिडकोच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, या मूल्यांकन प्रक्रियेमध्ये सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालिका प्राजक्ता लवंगारे-वर्मा, व्यवस्थापिका (कार्मिक) विद्या तांबवे, सिडको तारा केंद्राच्या समन्वयक सुहास जोशी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
प्रकल्पग्रस्त दिव्यांग व्यक्तिंचे सर्वेक्षण
By admin | Published: September 13, 2016 2:54 AM