सर्वपक्षीय इच्छुक उमेदवारांचा जीव टांगणीला
By admin | Published: May 2, 2017 03:30 AM2017-05-02T03:30:05+5:302017-05-02T03:30:05+5:30
पनवेल महापालिकेच्या निवडणुकीचे अर्ज दाखल करण्यासाठी चार दिवस उरलेले आहेत. मात्र, असे असले तरी भाजपासह, शिवसेना
पनवेल : पनवेल महापालिकेच्या निवडणुकीचे अर्ज दाखल करण्यासाठी चार दिवस उरलेले आहेत. मात्र, असे असले तरी भाजपासह, शिवसेना व शेकाप आघाडीचे उमेदवार निश्चित झालेले नाहीत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांच्या मनात घालमेल वाढू लागली आहे.
पनवेल महापालिका निवडणुकीत इच्छुक उमेदवारांना नामनिर्देशनपत्र ६ मे २०१७पर्यंत दाखल करण्याची मुदत आहे. मात्र, पनवेलमधील प्रमुख पक्षांची उमेदवारी अद्यापही जाहीर न झाल्याने शेवटच्या दोन दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ शकते. असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. भाजपा व शिवसेना यांची युती होणार की नाही, या विवंचनेत सारेच सापडले होते. त्यामुळे शेकाप आघाडीनेही आपले उमेदवार घोषित केलेले नाहीत. अखेर भाजपा व शिवसेनेची युती न झाल्याने शेकाप आघाडीदेखील काँग्रेस व राष्ट्रवादी सोबत जागावाटप करून उमेदवारी घोषित करणार आहे. भाजपा व शिवसेनेच्या युतीबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांना विचारले असता, शिवसेनेसोबत युतीचा विषय संपला असल्याचे सांगत त्यांनी युतीच्या विषयावर पडदा टाकला.
शेकाप व काँग्रेस व राष्ट्रवादी यांची आघाडी होऊन दीड ते दोन महिने उलटून गेले आहेत. तरीदेखील आघाडीचे जागावाटप करण्यात आलेले नाही. आघाडीच्या जागावाटपाचा तिढा काही केल्या सुटलेला दिसत नाही. महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने १६ जागांची मागणी केली होती. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वसंत ओसवाल यांना याबाबत विचारले असता, आघाडीतून आम्हाला १२ जागा मिळाल्या असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, काँग्रेस पक्षाला किती जागा मिळणार आहेत हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. पसंतीच्या प्रभागातून तिकीट मिळत नसल्याने काँग्रेसचे काही इच्छुक उमेदवार नाराज झाल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे काही प्रभागांतून आघाडीला बंडखोरीचा सामना करावा लागू शकतो. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आर. सी. घरत यांना याबाबत विचारले असता, त्यांनी बैठकीमध्ये असल्याचे सांगत यावर बोलण्याचे टाळले.