नवी मुंबई : कोपरखैरणेमध्ये फेरीवाल्यांकडून लाच घेताना अटक केलेल्या अमोल दहिवलेला २९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. पालिका प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन त्याला तत्काळ निलंबित केले आहे. महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी कार्यभार स्वीकारल्यापासून पारदर्शी कामकाजावर लक्ष केंद्रित केले आहे. कोपरखैरणेमध्ये १४ फेरीवाल्यांकडून लाच मागितली होती. गुरुवारी दहा हजार रुपये घेतल्याप्रकरणी अमोल दहिवले याला अटक झाली होती. या घटनेमुळे महापालिकेच्या अतिक्रमण विभागामध्ये पैशांची देवाण-घेवाण सुरू असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. फेरीवाल्यांकडूनही पैसे स्वीकारले जात असल्याचे सिद्ध झाले आहे. प्रकरणाचीही आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे. लाचखोर कर्मचाऱ्याला तत्काळ निलंबित केले आहे. पालिका प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही. यापुढेही गैरप्रकार व कामात हलगर्जी खपवून घेतला जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. पालिकेचे कामकाज पारदर्शी, लोकाभिमुख व गतिमान कॅशलेस प्रशासन करण्याचा प्रयत्न आहे. यामध्ये नागरिकांनीही महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. अटक केलेल्या कर्मचाऱ्याला लाचलुचपत विभागाने न्यायालयात हजर केले असता त्याला ठाणे विशेष न्यायालयाने २९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (प्रतिनिधी)
लाच घेणारा पालिका कर्मचारी निलंबित
By admin | Published: April 29, 2017 1:58 AM