- वैभव गायकरपनवेल : रस्ते अपघात रोखण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि वाहतूक पोलिसांकडून बेशिस्त वाहन चालकांवर कठोर कारवाई मोहीम सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत वाहतूक नियम पायदळी तुडविणाऱ्या ४९२ वाहनधारकांचे परवाने निलंबित करण्याची कारवाई पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केली आहे. कारवाईचा हा आकडा चालू आर्थिक वर्षातील आहे.वेगाने वाहन चालविणे, सिग्नल तोडणे, वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे, मद्यपान करून वाहन चालविणे, आदी प्रकारे वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणाºया वाहन चालकांचे परवाने किमान तीन महिन्यांसाठी निलंबित केले जाणार आहे. या निलंबनाच्या कालावधीत वाहन अपेक्षित नसतानादेखील संबंधित वाहनचालक वाहन चालवीत असेल तर संबंधित वाहनचालकावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे. वाहतूक पोलिसांच्या मार्फत प्रादेशिक परिवहन कार्यालयाला ९0३ वाहन चालकांचे परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. यानंतर पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून ४९२ परवाने रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ते सुरक्षा समितीने दिलेल्या निर्देशानुसार वाहतूक नियमाविषयी केलेल्या कारवाईचा आढावा राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फन्सिंगद्वारे नुकताच घेण्यात आला. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, प्रादेशिक परिवहन अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर राज्यभरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उचलण्यात आलेला आहे.
पनवेल आरटीओकडून ४९२ परवाने निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 12:25 AM