पनवेल : खारघर गावातील लुंबिनी बुद्धविहारावर मोठ्या फौजफाटा घेऊन कारवाईसाठी आलेल्या सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रक विभागाच्या पथकाला मंगळवारी स्थानिक प्रकल्पग्रस्त व सर्वपक्षीय राजकीय पदाधिकाऱ्यांच्या विरोधामुळे माघार घ्यावी लागली. खारघर गावातील बाबुराव धर्मा कांबळे यांनी लुंबिनी बुद्धविहार ट्रस्टमार्फत हे बुद्धविहार बांधले आहे. सकाळी १०च्या सुमारास सिडकोचे अनधिकृत बांधकाम नियंत्रक विभागाचे ए. के. राठोड हे अधिकारी अनधिकृत बांधकाम नियंत्रक विभागाच्या पथकासह या ठिकाणी आले. या वेळी खारघर गावातील रहिवासी व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन कारवाईचा विरोध केला. या वेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा उपस्थित होता. उपस्थितांमध्ये आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड, शेकापचे गुरु नाथ गायकर, अजित अडसूळ, संतोष गायकर, बळीराम ठाकूर, कॅप्टन कलावत, भाजपाचे अभिमन्यू पाटील, विजय पाटील, प्रभाकर जोशी, शत्रुघ्न काकडे, लीना गरड, प्रीती ठोकळे आदींसह शेकडोंच्या संख्येने जमावाने एकत्र येऊन विरोध दर्शविल्याने सिडको अधिकाऱ्यांनी कारवाई पुढे ढकलली. संबंधित बुद्धविहारासंदर्भात उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर बुधवार, १५ रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती अॅड. कांबळे यांनी दिली. (प्रतिनिधी)
बौद्धविहारावरील कारवाई स्थगित
By admin | Published: February 15, 2017 5:00 AM