महामार्गावरील खड्ड्यांविरोधी मनसेचे आंदोलन स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 03:44 AM2018-08-14T03:44:01+5:302018-08-14T03:44:09+5:30
गोवा महामार्गाच्या दुरवस्थेबद्दल मनसेने १५ आॅगस्ट रोजी पुकारलेल्या आंदोलनाला स्थगिती दिली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून ५ सप्टेंबरपर्यंत खड्डे बुजवण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन दिले.
पनवेल : गोवा महामार्गाच्या दुरवस्थेबद्दल मनसेने १५ आॅगस्ट रोजी पुकारलेल्या आंदोलनाला स्थगिती दिली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून ५ सप्टेंबरपर्यंत खड्डे बुजवण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्याने हे आंदोलन ५ सप्टेंबरपर्यंत स्थगित करण्यात आल्याचे मनसेच्या बैठकीत जाहीर करण्यात आले. बैठकीला मनसे वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक, जिल्हा संघटक गोवर्धन पोलसानी, जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, देवेंद्र गायकवाड, अतुल भगत, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा ज्योती मालवणकर, सपना देशमुख, वर्षा देशमुख, नाविक सेनेचे संदेश ठाकूर, वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष अभिषेक दर्गे, दिलीप सांगळे, केसरीनाथ पाटील, मनविसेचे राजेश कोळी, शालोम पेणकर आदी उपस्थित होते.
दरवर्षी गणेशचतुर्थीच्या काही दिवस आधी महामार्गाच्या दुरु स्तीचे काम हाती घेतले जाते. मात्र, ही मलमपट्टी तकलादू असल्याने अल्पावधीतच रस्त्याची अवस्था जैसे थे होते. मुंबई-गोवा महामार्गावर पळस्पे ते इंदापूर या दरम्यान मोठे खड्डे पडल्याने दुर्दशा झाली असून, अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. महामार्गाची दुरवस्था पाहून या महामार्गाला देवेंद्र ते नरेंद्र व्हाया राष्ट्रीय महामार्ग असे नामकरण करण्यात येणार होते. मनसे आणि मनसेची अंगीकृत संघटना महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने १५ आॅगस्ट रोजी हे आंदोलन होणार होते आणि त्याच दिवशी पळस्पे ते इंदापूर या मार्गावर एक लाख वृक्षांची लागवडही करण्यात येणार होती; पण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने मनसेला लेखी आश्वासन देण्यात आले आहे. आश्वासनात येत्या ५ सप्टेंबरपर्यंत हा महामार्ग खड्डेमुक्त झाला असेल, असे आदेशच कंत्राटदार सुप्रीम कंपनीला देण्यात आले आहेत, त्यामुळे आंदोलन करू नये, अशी विनंती प्राधिकरणाने केली होती.