गणवेशसह स्काडाचा प्रस्ताव स्थगित, पालिका शाळेतील ३१ हजार विद्यार्थी गणवेशापासून वंचित
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 03:48 AM2018-12-29T03:48:27+5:302018-12-29T03:48:45+5:30
पालिका शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गणवेश खरेदी करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने स्थगित ठेवला आहे. यामुळे ३१ हजार विद्यार्थी व पालकांची पुन्हा निराशा झाली आहे.
नवी मुंबई : पालिका शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गणवेश खरेदी करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने स्थगित ठेवला आहे. यामुळे ३१ हजार विद्यार्थी व पालकांची पुन्हा निराशा झाली आहे. पाणीपुरवठा विभागातील स्काडा प्रणालीचा प्रस्तावही पुन्हा एक आठवड्यासाठी थांबविण्यात आला आहे.
नवी मुंबई महानगरपालिका शाळेत शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना जवळपास तीन वर्षांपासून गणवेशापासून वंचित राहावे लागले आहे. गणवेशाची रक्कम थेट बँक खात्यात जमा करण्याच्या धोरणामुळे दोन वर्षे सर्वांना शैक्षणिक साहित्य पुरविता आले नाही. जुलैमध्ये शासनाने थेट बँक खात्यात पैसे जमा करण्याऐवजी निविदा काढून गणवेश खरेदीस परवानगी दिली आहे. आयुक्त रामास्वामी एन. यांनी विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे गणवेश मिळावे, यासाठी गणवेशाचे डिझाइन बदलून घेतले व निविदा प्रक्रिया राबविली. निविदा प्रक्रियेमध्ये मफतलाल इंडस्ट्री, नागालँड सेल्स एम्पोरिअम, सियाराम सिल्क मिल्स व प्रागज्योतिका - आसाम एम्पोरिअम आसाम गव्हर्मेंट मार्केटिंग कार्पोरेशन यांनी निविदा सादर केल्या होत्या.
प्रागज्योतिका कंपनीने कमी दराच्या निविदा सादर केल्यामुळे त्यांची निविदा स्वीकारण्यात आली. या कंपनीचे दर प्रशासकीय दराच्या ११.१३ टक्के जास्त असल्याने त्यांना दर कमी करण्याचे पत्र दिले होते. संबंधित कंपनीने अंदाजपत्रकीय दराप्रमाणे काम करण्यास मंजुरी दिल्यानंतर हा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीमध्ये सादर केला होता; परंतु समितीमध्ये अनेक नगरसेवकांनी या प्रस्तावावर आक्षेप घेतले. मूळ कंपनीने पॉवर आॅफ अॅटर्नी एक साध्या पत्रावर दिली आहे. संबंधितांना गणवेश पुरविण्याचा अनुभव नसल्याचे निदर्शनास आणून दिले. शैक्षणिक वर्ष संपत आले असताना गणवेश देण्याची गरज आहे का? असा प्रश्नही काही सदस्यांनी उपस्थित केला. आयुक्तांनी सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतरही आठ कोटी ११ लाख रुपयांचा हा प्रस्ताव स्थगित करण्यात आला.
स्थायी समितीच्या गतआठवड्यातील बैठकीमध्ये पाणीपुरवठा सेवेकरिता उभारण्यात आलेल्या जलदगती माहिती व नियंत्रण यंत्रणा (स्काडा प्रणाली)ची देखभाल दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला होता. सदस्यांनी अनेक प्रश्न उपस्थित करून एका आठवड्यासाठी स्थगित केला होता. सभापतींसह सदस्यांनी स्काडा प्रणाली केंद्रास भेट दिली असता, ही यंत्रणा बंद असल्याचे निदर्शनास आले होते. यामुळे या विषयावर चर्चा करताना सदस्यांनी पुन्हा प्रश्न उपस्थित केले व हाही प्रस्ताव एक आठवड्यासाठी स्थगित केला. दोन्ही महत्त्वाकांक्षी प्रस्ताव नामंजूर केल्यामुळे लोकप्रतिनिधी प्रशासनाचे धोरणात्मक प्रस्ताव मुद्दाम अडवत असल्याची चर्चा सुरू झाली असून, पुढील आठवड्यात होणाºया निर्णयाकडे लक्ष लागले आहे.
आयुक्तांनी दिली उत्तरे
विद्यार्थ्यांना गणवेश मिळाल्यास त्याचा उपयोग पुढील वर्षासाठीही होऊ शकतो. पारदर्शीप्रमाणे निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. आक्षेप घेणाºया परिवहन सदस्यास पुरावे देण्यास सांगितले असता ते काहीही पुरावे देऊ शकलेले नाहीत, असे स्पष्ट केले.
माजी महापौरांची नाराजी
पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश मिळावा, यासाठी माजी महापौर सुधाकर सोनावणेही नेहमीच आग्रही राहिले आहेत. गणवेश खरेदीचा प्रस्ताव मंजूर होईल, या अपेक्षेने तेही पालिका मुख्यालयात आले होते; परंतु प्रस्ताव स्थगित होताच त्यांनीही नाराजी व्यक्त केली. विद्यार्थ्यांना गणवेश मिळणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
परिवहन सदस्याचा आक्षेप
काँगे्रसचे परिवहन सदस्य सुधीर पवार यांनी या प्रस्तावावर आक्षेप घेतले आहेत. ठेकेदाराने पॉवर आॅफ अॅटर्नीविषयीच्या नियमांचे पालन केलेले नाही. त्यांना विद्यार्थ्यांना गणवेश खरेदीचा अनुभव नसल्याचेही स्पष्ट केले असून, ठेकेदाराने सादर केलेल्या सर्व कागदपत्रांची तपासणी होणे आवश्यक असल्याची मागणी केली आहे.