लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मॉडेल कृतिका चौधरीच्या हत्या प्रकरणातील संशयित व तिचा पूर्वाश्रमीचा पती विजय द्विवेदीला अंबोली पोलिसांनी फसवणूकीच्या एका अन्य गुन्ह्यामध्ये अटक केली आहे. खोटे दस्ताऐवज व धनादेश देवून त्याने फसवणूक केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आल्याचे सांगण्यात आले. २९ वर्षाची मॉडेल कृतिका चौधरी ही १२ जूनला अंधेरीतील राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आली होती. २ ते ३ दिवसांपूर्वी डोक्यावर गंभीर वार करुन तिला मारण्यात आल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले होते. मात्र पोलिसांना अद्याप या घटनेचा उलगडा करण्यात करता आलेला नाही. घटस्फोटानंतरही विजय हा कृतिकाच्या संपर्कात होता, त्यामुळे त्याच्यावर पोलिसांचा संशय आहे. त्याला ताब्यात घेवून चौकशी करण्यात आली होती. मात्र दरम्यानच्या काळात फसवणूकीचा अन्य गुन्हा दाखल झाल्याने त्याला शनिवारी रात्री अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. विनोद द्विवेदी याने महेशकुमार गोपालदास नरोला (५९) यांना चित्रपटासाठी सरकारकडून अनुदान मिळवून देतो, असे सांगून त्यांच्याकडून ५५ लाख रुपये घेतले होते. वारंवार पाठपुरावा करुनही रक्कम देण्यास टाळाटाळ करीत असल्याने अखेर नरोला यांनी अंबोली पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तक्रार दिली. रविवारी न्यायालयात हजर केले असता २७ जूनपर्यत पोलीस कोठडी मिळाली.
मॉडेल कृतिका चौधरीच्या हत्या प्रकरणी घटस्फोटित पतीला अटक
By admin | Published: June 27, 2017 2:55 AM