पनवेल : शासनाच्या निर्देशानुसार पालिकेची सभा ऑनलाईन आयोजित केल्यानंतरही शेकाप महाविकास आघाडीचे नगरसेवक सभागृहात उपस्थित राहिल्याने पीठासीन अधिकारी महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी शेकाप महाविकास आघाडीचे १४ व एका भाजप नगरसेविकेचे सोमवारी निलंबन केले. मालमत्ता कर आकारणीसाठी आयोजित केलेल्या विशेष सभेत परवानगी नसताना हजर राहून गोंधळ घातल्याप्रकरणी ही कारवाई केली.या नगरसेवकांमध्ये भाजपच्या नगरसेविका लीना गरड, शेकापचे नगरसेवक गणेश कडू, शंकर म्हात्रे, गोपाळ भगत, रवींद्र भगत, ज्ञानेश्वर पाटील, राष्ट्रवादीचे नगरसेवक विजय खानावकर, विष्णू जोशी, डॉ. सुरेखा मोहोकर, प्रीती जॉर्ज म्हात्रे, प्रिया भोईर, उज्वला पाटील, प्रज्योती म्हात्रे, कमल कदम, सारिका भगत आदी नगरसेवकांचे निलंबन करण्यात आले. मालमत्ता करासारख्या महत्त्वाच्या विषयी सभागृहात आम्हाला बाजू मांडून द्यावी म्हणून विरोधी पक्षाचे नगरसेवक सभागृहात हजर राहिले होते. ऑनलाईन सभेत सत्ताधारी बोलू देत नसल्याने विरोधकांनी सभागृहात हजेरी लावली. विशेष म्हणजे दोन तास विरोधकांनी महापौरांना सभा सुरू करण्याची विनंती केली. मात्र महापौरांनी विरोधी पक्षाच्या सदस्यांना बाहेर जाण्यास सांगितले. तरीही विरोधी पक्षातील सदस्य आपल्या मागणीवर ठाम होते. यानंतर पोलिसांना सभागृहात पाचारण करण्यात आले. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी विरोधकांची समजूत काढत त्यांना सभागृहाबाहेर काढले. यानंतर विशेष सभा सुरू झाली. प्रशासनाने मालमत्ता कर प्रणालीची माहिती दिली. मात्र गोंधळामुळे उशीर झाल्याने सभा तहकूब करण्यात आली. तहकूब सभा ६ एप्रिल रोजी पार पडणार आहे.
पनवेल महापालिकेतील १५ नगरसेवकांचे निलंबन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2021 1:46 AM