पनवेल - पनवेल महापालिकेच्या मालकीच्या हौदावर एका कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याबद्दल पाणिपुरवठा विभागाच्या काही कर्मचा-यांनी आयोजित केलेली पार्टी या कर्मचा -यांच्या चांगलीच अंगलट आली आहे . या पार्टीचे व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे महापालिकेची प्रतिमा मलिन झाल्याचे कारण दाखवित नृत्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आयुक्त गणेश देशमुख यांनी निलंबित केले आहे. पनवेल महापालिकेतील एका कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम महापालिकेत आयोजित करण्यात आला होता. पाणीपुरवठा विभागातील या कर्मचाऱ्याचा सेवानिवृत्तीचा अधिकृत कार्यक्रम पार पडल्यानंतर पाणिपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांनी पनवेल एसटी स्थानकाच्या मागील बाजूस असलेल्या महापालिकेच्या हौदाजवळ पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांनी मद्य सेवन करीत चांगलाच धिंगाणा घातला होता . पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता रावसाहेब तायडे यांच्यासह इतर कर्मचारी नृत्य करीत असल्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला .शहरात सध्याच्या घडीला भीषण पाणी समस्याच निर्माण झाली असताना . पाणी पुरवठा अधिका-यांनी घातलेल्या या धिंगाण्यावर पनवेलकरांमध्ये असंतोष पसरला होता . आयुक्तांपर्यंत हा विषय गेल्यांनतर त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत या पार्टीत सहभागी अधिकारी व कर्मचा-यांच्या निलंबनाचा निर्णय घेतला आहे . पाणिपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता रावसाहेब तायडे यांना निलंबित केल्याचा आदेश आयुक्त गणेश देशमुख यांनी काढला. तर पाणी पुरवठा विभागात किकिपर म्हणून कार्यरत असलेल्या मनोहर गोंधळी, बाबू बांगारे, गुरूनाथ भगत, अर्जुन गायकवाड, दिलिप घोडेकर या पाच जणांना निलंबित केल्याचा आदेश उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी काढला आहे. तसेच पाण्याच्या टाकीवर आयोजित केलेल्या पार्टीला जबाबदार म्हणून पंप ऑपरेटर संजय बहिरा आणि केसरी बहिरा या दोघांना प्रत्येकी ५ हजार रूपयांचा दंड आकारण्याचा निर्णय घेतला
शासकीय कर्मचाऱ्याला अशोभनीय वर्तूणूक ठरेल अशी कोणतीही गोष्ट करता कामा नये या महाराष्ट्र नागरी सेवा कायद्याप्रमाणे निलंबित केल्याची आदेशात म्हटले आहे.महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ५६ नुसार नियमाचा भंग केल्याप्रकरणी हि कारवाई करण्यात आली आहे .महानगर पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी केलेली कारवाई हि अद्याप पर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे .