वैभव गायकर
पनवेल:पनवेल महानगरपालिकेच्या कामोठे प्राथमिक आरोग्य केंद्रातुन खोटे करोना रूग्णांची नोंद करून चुकीचे अहवाल देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर पालिकेने निलंबनाची कारवाई केली आहे.माजी नगरसेवक डॉ अरुणकुमार भगत यांनी हि बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणुन दिल्यांनतर हि कारवाई करण्यात आली.
महापालिकेने या प्रकरणी डॉक्टर , फार्मांसिस्ट आणि लँब टेक्निशियन या पदावर कंत्राटी पध्दतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे. पॉसिटीव्ह रुग्णांचा घरचा पत्ता,मोबाईल क्रमांक सारखेच असल्याने डॉ अरुणकुमार भगत यांनी याबाबत अहवालात नमूद केलेल्या पत्त्यावर जाऊन प्रत्यक्ष पाठपुरावा केल्यानंतर हि बाब उघडकीस आली.या घटनेची दखल घेत आयुक्त गणेश देशमुख यांनी तत्काळ याबाबत चौकशीचे आदेश दिल्यानंतर महापालिका उपायुक्त सचिन पवार यांनी याबाबत केलेल्या चौकशीत 70 करोना रुग्णांचा अहवाल खोटा असल्याचे समोर आल्यावर पालिकेने तत्काळ दोषी कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली.