नवी मुंबई : तळोजा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या कैद्यांना रुग्णालयात नेल्यानंतर त्याठिकाणी त्यांना सवलत दिल्याप्रकरणी नवी मुंबईपोलिस आयुक्तालयातील एक अधिकारी व सहा कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. जे. जे. रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये कैद्याला नातेवाईकांसोबत भेटू देणे, मोबाईल, लॅपटॉप यांचा वापर करण्याची मुभा देणे असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
तळोजा कारागृहातील कैद्यांना पोलिस सुरक्षेत तपासणीसाठी जे. जे. रुग्णालयात नेल्यानंतर त्याठिकाणी त्यांना नियमबाह्य सवलती दिल्या जात असल्याची बाब समोर आली होती. सुमारे ३४ हजार कोटींच्या आर्थिक घोटाळ्यात कैदेत असलेल्या धीरज वाधवान व कपिल वाधवान या दोघा भावंडांना पोलिसांकडून विशेष सवलत मिळत होती. त्यांना रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये कुटुंबासह घरचे जेवण खाण्याची तसेच मोबाईल व लॅपटॉप वापरण्याची मुभा मिळत होती. हा प्रकार समोर आल्यानंतर नवी मुंबई पोलिस मुख्यालय उपायुक्त संजयकुमार पाटील यांनी संबंधित सहा पोलिसांवर निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामध्ये उपनिरीक्षक आशुतोष देशमुख, हवालदार विशाल दखने, सागर देशमुख, प्राजक्ता पाटील, रवींद्र देवरे, प्रदीप लोखंडे व माया बारवे यांचा समावेश आहे.
मंगळवारी रात्री त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान वाधवान बंधूंच्या कैदी पार्टीत इतरही एका सहायक निरीक्षकाचा समावेश होता अशीही चर्चा पोलिस वर्तुळात आहे. त्यामुळे ते अधिकारी कोण व त्यांची पाठराखण का ? याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. दरम्यान निलंबित करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्याविरोधात कोणतीही तक्रार नाही. त्यामुळे निलंबनाचे अधिकार असलेल्या पोलिस आयुक्तांऐवजी मुख्यालय उपायुक्तांनी कारवाई केल्याचीही चर्चा आहे.