बलात्काराची तक्रार घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या ‘त्या’ अधिकाऱ्याचे निलंबन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 04:18 AM2018-10-27T04:18:01+5:302018-10-27T04:18:06+5:30
बलात्काराची तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याच्या तरुणीच्या तक्रारीवरून खारघर पोलीस ठाण्यातील एका अधिका-यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
नवी मुंबई : बलात्काराची तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याच्या तरुणीच्या तक्रारीवरून खारघर पोलीस ठाण्यातील एका अधिका-यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. शनिवारी सकाळी ही तरुणी तिच्या तीन मित्रांसह पोलीस ठाण्यात गेली होती. परंतु या तरुणीनेच तक्रार नोंदवण्यास टाळल्याचे खारघर पोलिसांचे म्हणणे आहे.
सहायक पोलीस निरीक्षक महेश जाधव असे त्यांचे नाव आहे. शनिवारी दोन तरुण व तरुणी आले होते. तक्रारदार तरुणी दोन मित्रांसोबत शुक्रवारी रात्री खारघरमधे मैत्रिणीकडे आली. तेथे दोन मुले व दोन मुली असताना एकाने बलात्कार केल्याची तक्रार तिच्या वकिलाने पोलीस आयुक्तांकडे केली. शनिवारी सकाळी तिच्या खोलीत एक जण झोपल्याचे तिच्या मैत्रिणीने पाहिले. त्यानंतर चौघेही पोलीस ठाण्यात आले. रात्री काय घडले ते आठवत नसून, आपली तक्रार नसल्याचे तिने सांगितले. तशी नोंद पोलिसांकडे असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानंतर उल्हासनगरच्या वकिलामार्फत पोलीस आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीमुळे जाधव यांच्यावर कारवाई करण्यात आली.