चारित्र्याचा संशय : बार व्यावसायिकाकडून पत्नीची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 02:30 AM2018-06-27T02:30:25+5:302018-06-27T02:30:28+5:30
चारित्र्याच्या संशयावरून बार व्यावसायिकाने पत्नीची हत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी कोपरखैरणेत घडली. हत्येनंतर त्याने स्वत: एका व्यक्तीमार्फत पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली
नवी मुंबई : चारित्र्याच्या संशयावरून बार व्यावसायिकाने पत्नीची हत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी कोपरखैरणेत घडली. हत्येनंतर त्याने स्वत: एका व्यक्तीमार्फत पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती.
रेखा गौडा (३३) असे मयत महिलेचे नाव असून ती कोपरखैरणे सेक्टर १२ ए येथील लक्ष्मी नारायण कॉम्प्लेक्समध्ये पती व दोन मुलांसह रहायला होती. तिचा पती धर्मा गौडा (४५) हा बार व्यावसायिक असून त्याची शहरातील तीन बारमध्ये भागीदारी आहे. मागील काही दिवसांपासून त्याचा पत्नीच्या वागणुकीवर संशय होता. यावरून त्यांच्यात सतत वाद सुरू होते. याच कारणातून मंगळवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास धर्मा याने पत्नी रेखाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून तिची हत्या केली. यावेळी त्यांचा दहा वर्षांचा मुलगा शाळेत गेलेला होता, तर चार वर्षांची मुलगी बेडरुममध्ये झोपलेली होती. पत्नीच्या हत्येनंतर त्याने घटनास्थळावरून पळ काढल्यानंतर घरात पत्नीचा मृतदेह असल्याची माहिती एका व्यक्तीला दिली. सदर व्यक्तीने ही बाब कोपरखैरणे पोलिसांना कळवली असता, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी घरात रेखाचा मृतदेह पडल्याचे आढळून आले. गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकामार्फत घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेवून तो शवविच्छेदनासाठी पालिका रुग्णालयात पाठवला आहे. सहायक आयुक्त प्रदीप जाधव यांच्यासह वरिष्ठ निरीक्षक शिवाजी आवटे यांनीही घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. याप्रकरणी धर्मा गौडा याला ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.