पेपरतपासणीत घोटाळा झाल्याचा संशय; जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2019 01:22 AM2019-06-04T01:22:46+5:302019-06-04T01:22:57+5:30
पेपरतपासणीत असंवेदनशीलता आणि घोटाळा असून, या प्रकारची कोणीही जबाबदारी घेत नसल्याचा आरोप त्यांनी केला.
नवी मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल २८ मे रोजी जाहीर झाला आहे. अनेक विद्यार्थी या परीक्षेत नापास झाले असून, पेपरतपासणीत घोटाळा झाल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. शिक्षण विभागाच्या वाशी येथील मुंबई विभागीय मंडळाला त्यांनी पालक आणि विद्यार्थ्यांसह सोमवार, ३ जून रोजी मंडळाचे विभागीय अध्यक्ष कृष्णकुमार पाटील यांची भेट घेतली. विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने गुण पत्रिकांची फेरतपासणी करण्याची मागणी करण्यात आली.
बारावीचा निकाल जाहीर झाल्यापासून फेरतपासणीसाठी ऑनलाइन प्रकिया धिम्यागतीने सुरू असून गेल्या पाच दिवसांत फक्त १३७ झेरॉक्स काढण्यात आल्या आहेत या गतीने काम झाल्यास पुढील दोन महिनेही विद्यार्थ्यांना गुण मिळणार नसल्याची टीका आव्हाड यांनी केली. राज्यात सहा विद्यार्थ्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून, तीन विद्यार्थ्यांनी जीव गमावला असून फेरतपासणीत हे विद्यार्थी पास झाले असतील तर याला जबाबदार कोण? असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला. पेपरतपासणीत असंवेदनशीलता आणि घोटाळा असून, या प्रकारची कोणीही जबाबदारी घेत नसल्याचा आरोप त्यांनी केला. कोणताही शिक्षक आपल्या शाळातील विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकात शून्य मार्क देऊ शकत नाही. प्रत्येक विद्यार्थ्याला प्रात्यक्षिकात किती गुण मिळाले आहेत याचे सहीनिशीचे पत्र देण्याची मागणी आव्हाड यांनी केली. तसेच फेरतपासणी नंतर करा; परंतु ज्या विषयात विद्यार्थ्यांना शून्य मार्क दिले आहेत त्या विषयाच्या उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांना देण्यात याव्यात, अशी मागणी या वेळी त्यांनी केली. आव्हाड यांच्यासोबत विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण फलकावर प्रसिद्ध होणार
मुंबई विभागीय मंडळ, मुंबईशी संलग्न असलेल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयात या वर्षी बारावीच्या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत आणि प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये देण्यात आलेल्या आणि मंडळाकडे कार्यवाहीसाठी पाठविण्यात आलेल्या गुणपत्रिकेची प्रत महाविद्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्याची सूचना विभागीय सचिव शरद खंडागळे यांनी दिली आहे.