वैभव गायकर
पनवेल : खारघर सेक्टर १९ मध्ये दोन कावळ्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. ७ जानेवारी रोजी येथील पोलीस संमिश्र सोसायटीच्या कंपाउंडमध्ये कावळा मृत पावल्याची बाब या परिसरातील रहिवाशांच्या निदर्शनास आली. दोन दिवसांत दुसरा कावळाही मृत पावल्याने या संदर्भात पालिकेकडे लेखी तक्रार केली आहे.
सेक्टर १९ मधील रहिवासी व भाजपच्या खारघर तळोजा मंडळच्या उपाध्यक्ष बिना गोगरी यांनी या संदर्भात पालिकेकडे तक्रार केली आहे. विशेष म्हणजे सध्याच्या घडीला बर्ड फ्लूचा धोका वाढत आहे. कावळ्यांमध्येही बर्ड फ्लूची लक्षणे आढळल्याची घटना घडल्या असल्याने, गोगरी यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, मृत कावळ्यांची वैद्यकीय तपासणी करण्याची मागणी पालिकेकडे केली आहे. ७ जानेवारीनंतर निदर्शनास आलेल्या पहिल्या प्रकारानंतर शनिवारी व रविवारी असाच प्रकार उघडकीस आला आहे. खारघर सेक्टर ४ बेलपाडा व खारघर रेल्वे स्थानक परिसरात संशयास्पद पक्षी मृत अवस्थेत सापडल्याचे खारघर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच संजय घरत यांनी सांगितले.
प्रभाग अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा ७ जानेवारी रोजी तक्रार दाखल करूनही पालिका अधिकाऱ्यांनी काहीच कारवाई केली नाही. पनवेल महानगरपालिकेचे प्रभाग 'अ'चे अधिकारी दशरथ भंडारी यांना या संदर्भात विचारणा केली असता, त्यांनी संबंधित पशुवैद्यकीय विभागाच्या अखत्यारित येत असल्याचे सांगितले. याबाबत संबंधित विभागाला कळविण्याची तसदीही प्रभाग अधिकारी भंडारी यांनी घेतली नाही.
पशुवैद्यकीय अधिकारी देणार भेटसंबधित घटनेची माहिती पनवेल महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ.आनंद गोसावी यांना मिळताच, त्यांनी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. सोमवारी या संदर्भात माहिती घेण्यासाठी पशुसंवर्धन अधिकारी खारघरमधील मृत पावलेल्या पक्ष्यांच्या स्थळांना भेट देणार असल्याचे डॉ.गोसावी यांनी सांगितले.