नवी मुंबई : ‘सुंदर नवी मुंबई, स्वच्छ नवी मुंबई’ अशी बिरुदावली मिरवणाऱ्या शहरातील गावठाणाच्या गल्लीबोळात दूषित सांडपाणी, कचऱ्याचे ढिगारे यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिकेच्या घणसोली एफ विभागाच्या स्वच्छता विभागाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे चित्र पाहावयास मिळते आहे.
घणसोली चर्चच्या मागील रस्त्यावर सेक्टर ८ येथील भूखंड क्र.१८ समोर कचऱ्याकुंड्यामधील कचरा पडलेला असूनही स्वच्छता अधिकारी मात्र या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत नसल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. घणसोली विभागाच्या स्वच्छता अधिकाऱ्यांनी घंटागाडीची वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या वाहतुकीवर लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच गावठाणातील उघडी गटारे, गल्लीबोळातील केरकचरा साफसफाईसंदर्भात घणसोली परिसरातील घणसोली, तळवली, गोठीवली, रबाले आणि नोसिल नाका परिसरातील पाच गावांतील समस्यांसाठी दररोज दोन तास वेळ काढून पाहणी दौरा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.