नवी मुंबई - येथील एका खासगी रुग्णालयाने पहिली स्वॅप मूत्रपिंड शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. या स्वॅपमध्ये दोन कुटुंबाचा सहभाग होता, उरणमधील सीथा कुटुंब आणि सायनमधीन सैनी कुटुंब. वैद्यकीय गुंतागुंतीमुळे कुटुंबातील सदस्यांना स्वतःच्या नातेवाईकांना मूत्रपिंड दान करणे अशक्य झाल्यामुळे या दोन कुटुंबांनी एकमेकांमध्ये मूत्रपिंडाची अदलाबदल केली. या प्रकरणात राहुल सीथा यांच्या मातोश्री सुनंधा सीथा यांनी गुरुदेव सिंह यांच्या पत्नी परविंदर सिंह यांना मूत्रपिंड दान केले, तर गुरुदेव सिंह यांनी राहुल सीथा यांना मूत्रपिंड दान केले.
शेवटच्या टप्प्यातील मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी मूत्रपिंड प्रत्यारोपण हा एकमेव उपचारात्मक पर्याय असतो आणि ज्यांना दाता मिळत नाही त्यांना डायलिसिसवर ठेवले जाते. स्वॅप प्रत्यारोपणामुळे दात्याची कमतरता कमी होण्यास मदत मिळते. स्वॅप प्रत्यारोपण म्हणजे रक्तगट आणि एचएलए जुळत नसल्यामुळे जे स्वतःच्याच कुटुंबातील सदस्यांना अवयव दान करु शकत नाही, अशा दोन कुटुंबातील ही अवयवांची देवाणघेवाण असते. स्वॅप प्रत्यारोपण आपल्या कुटुंबातील सदस्यांना अवयव दान करू इच्छिणाऱ्या परंतु विसंगतीच्या समस्येमुळे दान करू शकत नसलेल्या दात्यांच्या समूहाचा विस्तार करून अवयवदानाची असलेली तीव्र कमतरता दूर करते.
सुनंधा सीथा (49 वर्षे) यांना आपल्या मुलाला म्हणजे राहुल सीथाला (28 वर्षे) मूत्रपिंड दान करायचे होते तर गुरुदेव सैनी (64 वर्षे) यांना आपल्या पत्नीला, परविंदर सैनी (61 वर्षे) यांना मूत्रपिंड दान करायचे होते परंतु विसंगतीमुळे सुनंधा किंवा गुरुदेव या दोघांनाही त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना अवयव दान करता आले नाही.
डॉ.अमोलकुमार पाटील, सल्लागार-युरॉलॉजी, मूत्रपिंड प्रत्यारोपण शल्यविशारद रोबोटिक म्हणाले की," गुरुदेव सैनी यांचा रक्तगट होता ए+ आणि त्यांच्या पत्नीचे एबी+. तिच्यामध्ये तिच्या पतीविरुद्ध दाता विशिष्ट प्रतिपिंडाचे (डीएसए) उच्च अनुमाप होते आणि अस्वीकृतीची उच्च (30-40%) जोखीम होती. तिला मुंबई शहरात गेले 18 महिने एकही सुसंगत दाता सापडला नाही. त्याचप्रमाणे राहुल सीथा (ओ+) यांच्यामध्ये त्यांची आई सुनंधा (बी+) उच्च अनुमाप रक्तगटाचे प्रतिपिंड होते. म्हणजे अस्वीकृतीच्या जोखमीसह प्रत्यारोपणासाठी जास्त खर्च आणि उच्च प्रतिरक्षादमन अशी परिस्थिती होती. या स्वॅप प्रत्यारोपणाच्या प्रक्रियेत, दोन्ही प्राप्तकर्त्यांमध्ये डीएसएचे कमी अनुमाप दाखवले आणि यशस्वी होण्याची पातळी देखील उच्च होती, तसेच कमी क्षमतेच्या औषधांची गरज होती व संक्रमणाची शक्यता देखील कमी होती."
प्रादेशिक मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष मराठे म्हणाले,"हे रुग्ण एक वर्षाहून अधिक काळ योग्य दात्याच्या प्रतिक्षेत होते. स्वॅप प्रत्यारोपणामुळे त्यांना सुसंगत दाता शोधण्यास मदत मिळाली. रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सहकार्यामुळे आणि त्यांनी डॉक्टरांवर ठेवलेल्या विश्वासामुळे आम्ही नवी मुंबईतील पहिले स्वॅप प्रत्यारोपण करण्यात यशस्वी ठरलो. यामुळे दोन लोकांना नवे जीवन मिळाले. अशा प्रक्रियांमुळे शेवटच्या टप्प्यातील मूत्रपिंडाचे आजार असलेल्या रुग्णांना आशेचा किरण मिळतो.