नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: दिवाळीनंतरही महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश व अत्यावश्यक शैक्षणीक साहित्य वाटप करण्यात आले नाही. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासन फक्त आश्वासन देत असल्यामुळे स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून शुक्रवारी शिक्षण उपायुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले. विनाविलंब शैक्षणीक साहित्य उपलब्ध करून देण्याची मागणी आंदोलकांनी केले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणीक साहित्य महानगरपालिकेच्या माध्यमातून देण्यात येते. परंतु यावर्षी दिवाळीपर्यंतचे पहिले सत्र संपल्यानंतरही हे साहित्य अद्याप देण्यात आलेले नाही. सर्वसामान्य घरातील विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. पालकांनीही तीव्र नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. स्वराज्य संघटनेचे जिल्हा अध्यक्ष उमेश जुनघरे यांनी याविषयी महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे उपायुक्त दत्तात्रय घनवट व मनपा आयुक्तांकडेही मागणी केली होती. परंतु फक्त आश्वासन देण्यात येत होते. यामुळे संतापलेल्या स्वराज्यच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी उपायुक्तांच्या दालनामध्येच आंदोलन केले. जमीनीवर ठिय्या मांडूुन तत्काळ गणवेश सह शैक्षणीक साहित्य देण्यात यावे. दिरंगाई करणाऱ्या अधिकारी,कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. प्रशासनाने पुढील पाच ते सहा आठवड्यात गणवेश उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
आंदोलनामध्ये जिल्हा अध्यक्ष उमेश जुनघरे, मयुर धुमाळ, योगेश पवार, सागर पावघे, विनायक जाधव, अमोल निंबाळकर, नितीन घार्गे, विनोद जाधव, अमर संकपाळ, बिपीन गायकवाड, जगदीश गोळे, आशिष मोरे, राहुल शिंदे, आशुतोष शिंदे, सुनील धनावडे, गणेश शिंदे, रवी शिंदे, रोहित संकपाळ, श्रवण शिंदे, विजय धनावडे, विश्वंभर रनखांब, गणेश खपके, लक्ष्मण शेलार, वंदन कोळी, शंकर जाधव व इतर पदाधिकारी उपस्थित होते.