नवी मुंबई : राज्यातील राजकारण्यांनी नीतीमत्ता गुंडाळून ठेवली आहे. आज या पक्षात असलेले उद्या दुसऱ्या पक्षात उड्या मारत आहेत. राजकीय आरोप प्रत्यारोपांना नागरिक कंटाळले आहेत. त्यांना पर्याय हवा असून, २०२४ मध्ये स्वराज्य संघटना सर्व निवडणुका लढणार असल्याची घोषणा संभाजीराजे यांनी केली आहे.
नवी मुंबईमध्ये रविवारी स्वराज्य संघटनेचा मेळावा झाला. यावेळी संभाजीराजेंनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. नागरिकांना पर्याय हवा असून, तो स्वराज्यच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. आरोग्याच्या समस्येवर लक्ष वेधताना भूम येथील आरोग्य केंद्राची चित्रफीत त्यांनी दाखविली. आरोग्यमंत्री व कृषिमंत्र्यांवरही त्यांनी टीका केली.
आशिया खंडातील सर्वांत मोठी बाजार समिती नवी मुंबईत आहे, पण येथे शेतकरी भवन बांधले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. भाजप आमदार गणेश नाईक यांच्यावरही त्यांनी टीका केली. व्हाइट हाऊसमध्ये बसून काही जण स्वत:ची मनमानी करत आहेत. यापुढे ती चालणार नाही, असेही ते म्हणाले.