लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : सानपाडा येथील १२ वर्षाच्या नील शेकटकर याने बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया हे अंतर बॅक स्ट्रोक पद्धतीने ५ तास ३२ मिनीटात पूर्ण केले. जलतरणातील नवीन विक्रम प्रस्थापीत केला असून यशाची गुढी उभारली आहे.
मराठी नववर्षाचे स्वागत वेगळ्या पद्धतीने करण्यासाठी नील शेकटकरने बेलापूर ते गेट वे ऑफ इंडीया हे अंतर बॅक स्ट्रोक पद्धतीने पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी मध्यरात्री १२.५४ ला बेलापूर खाडीतून पाेहण्यास सुरुवात केली. ५ तास ५२ मिनीटात त्याने २६ किलोमीटरचे अंतर पूर्ण केले. हा नवीन विक्रम प्रस्थापित झाला आहे. यापूर्वी नीलने एलिफंटा ते गेट वे ऑफ इंडिया हे १५५ किलोमीटरचे अंतर २ तास ४५ मिनीटात पूर्ण केले होते.
या यशाबद्दल नीलचे शिवसेना उपनेते विजय नाहटा, अश्निनी मते, शिवसेना उपजिल्हा प्रमुख मिलींद सुर्यराव व इतरांनी अभिनंदन केले. नील वाशीतील फादर ॲग्नेल स्वीमींग क्लबमध्ये प्रतिदिन चार ते पाच तास सराव करत आहे. आठवड्यातून एकवेळ उरणच्या समुद्रातही प्रशिक्षण घेत आहे. यामध्ये त्याला संदीप यादव, अमित आवळे, किशोर पाटील, गोकुळ कामत यांचे मार्गदर्शन लाभले.