पनवेल : देश भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी कॅशलेस व्यवहारास प्रोत्साहन देण्याच्या धोरणानुसार शिवकर व उसर्ली खुर्द ग्रामपंचायत आणि बँक आॅफ बडोदाने उचललेले पाऊल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील विश्वास सार्थ करण्याची चांगली सुरु वात असल्याचे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. कॅशलेस प्रणालीसाठी व्यापाऱ्यांना स्वाईप मशिनचे वाटप करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. सोमवारी शिवकर येथील राकेश जैन विद्या मंदिरात भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शिवकर व उसर्ली खुर्द येथील व्यापारी, दुकानदार व छोट्या व्यावसायिकांना स्वाईप मशिनचे मोफत वाटप करण्यात आले. या कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी बँक आॅफ बडोदाचे महाव्यवस्थापक नवतेज सिंग होते. क्षेत्रीय प्रबंधक सुनील श्रीवास्तव, उपक्षेत्रीय प्रबंधक रमेश ठक्कर, भाजपा मोर्चाच्या हिना भक्ता,शिवकर सरपंच मोहिनी पोपटा, उसर्ली सरपंच मनीषा वाघमारे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रकाश विचारे व त्यांचे सहकारी यावेळी उपस्थित होते. विकास, सुविधा हव्या असतील तर सरकारी कर भरणे गरजेचे आहे. कॅशलेस व्यवहाराचे नियम सुरुवातीला कठीण वाटतील पण भविष्यात त्याचा आपल्याला फायदा मिळेल, असा विश्वास यावेळी ठाकूर यांनी व्यक्त केला. पनवेल तालुक्यात दोन गावांनी कॅशलेस गाव बनण्याचा मान मिळवल्याबद्दल ठाकूर यांनी सरपंचांचे कौतुक केले. बँक आॅफ बडोदाचे महाप्रबंधक नवजेतसिंग यांनी, योग्य गावाची निवड केल्याबद्दल समाधान व्यक्त करून गावात १३ मशिन दिल्या असून उरलेल्या १६ व्यापाऱ्यांना लवकरच मशिन वाटप करण्यात येणार असल्याचे सांगितले. अटल पेन्शन योजना व केंद्र सरकारच्या खातेदारांना असलेल्या विमा योजनांची व गिफ्ट कार्डची माहिती यावेळी उपस्थितांना देण्यात आली. (वार्ताहर)रायगड जिल्ह्यात ग्रामीण भागातील महिलांना रोकडविरहित मशिनची माहिती देण्याचे काम भाजपाच्या महिला मोर्चातर्फे केले जात आहे. शिवकर व उसर्ली येथील महिलांना प्रशिक्षण दिले असून त्याचा चांगला वापर त्या करू शकतात. त्यामुळे ही दोन्ही गावे रोकडविरहित व्यवहार करण्यात यशस्वी होतील.- हिना भक्ता, सदस्य, भाजपा महिला मोर्चा गाव रोकडविरहित झाल्याचा अभिमान आहे, पण गावात बँकेची एकही शाखा नाही. ती सुरू केल्यास, बँकेत गावातील १००० खाती उघडण्यास मदत करू शकतो.- मोहिनी पोपटा, सरपंच, शिवकर
व्यापाऱ्यांना दिले स्वाईप मशिन
By admin | Published: December 27, 2016 2:57 AM