पनवेल : पनवेल तालुक्यातील मोहो गावातील ग्रामस्थ स्वयंस्फूर्तीने ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना अखंडपणे राबवित असून यंदाचे हे ६६ वे वर्षे आहे. जवळपास ३५० ते ४०० घरांची वस्ती असलेल्या मोहो गावातील ग्रामस्थ पक्षभेद, मतभेद, वाद-विवाद, भांडण-तंटे विसरून एकात्मकतेचे दर्शन घडवित बाप्पाची अनंत चतुर्दशीपर्यंत दिवस-रात्र सेवा करीत असतात. लोकमान्य टिळकांनी समाजाला एकत्र आणण्यासाठी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा मोहो ग्रामस्थांनी जपून समाजापुढे आदर्श उभा केला आहे.
मोहो गावाच्या मध्यभागी श्री हनुमानाचे मंदिर आहे. या मंदिरात १९५४ रोजी ग्रामस्थांनी श्री गणेश चतुर्थीला ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना राबवत गणपतीची प्रतिष्ठापना केली. त्या वेळी गावातील ग्रामस्थ सीताराम आंबो शेळके, बाळू गोमा पाटील, दुनकूर धाऊ पाटील, काथोर उंदऱ्या म्हात्रे, तुकाराम गणपत पाठे, दत्तू बाळू पाटील, बारकू दामा पाटील, सीताराम दगडू पाटील, सावळाराम गणपत पाटील, धोंडू धाऊ पाटील, गणपत महादू म्हात्रे, विठ्ठल तनू कडव आदीनी पुढाकार घेतला.
अनंत चतुर्दशीपर्यंत बाप्पाच्या चरणी दररोज सामुदायिक काकडा, ज्ञानेश्वरी पारायण, संध्याकाळी, रात्री कीर्तन-भजन केले जाते. गावातील प्रत्येकाला बाप्पाच्या सेवेचा लाभ मिळावा, यासाठी प्रतिदिन ३५ ते ४० घरे गणपतीच्या सेवेसाठी नेमली जातात. उत्सवात वीणा जमिनीवर न ठेवता, त्याचे अखंड पूजन केले जाते.