पनवेल : महिला बालकल्याण निधीमधून १० वी, १२ वीमध्ये ८५ टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना खारघर ग्रामपंचायतीच्या वतीने मोफत टॅबचे वाटप करण्यात आले. शनिवारी खारघरमधील उत्कर्ष हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी १५ टक्के मागासवर्गीय निधीमधून आदिवासी बांधवांना गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले. शेकाप जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील कार्यक्र माला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.रायगड जिल्ह्यातील श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून खारघर ग्रामपंचायतीची ओळख आहे. खारघर शहर हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून उदयास येत आहे. शिक्षणाच्या बाबतीत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामपंचायत नेहमीच पुढाकार घेत असते. आज विज्ञानाने मोठी प्रगती केली आहे. अत्याधुनिक युगात विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात उपयोगात येईल, या हेतूने खारघरमधील २४९ विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी खारघर ग्रामपंचायतीच्या सरपंच अंजनी ठाकूर, ग्रामसेवक नवनाथ शेडगे, उपसरपंच सोमनाथ म्हात्रे, पंचायत समिती सभापती चित्रा गायकर, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर पवार, गुरु नाथ गायकर, आशिष भोईर, अशोक गिरमकर, ग्रामपंचायत सदस्या स्नेहा बारशे, अनिता पाटील, कुंदा पाटील, उषा अडसुळे, संजय घरत, शंकर म्हात्रे, नीलेश बाविस्कर आदी उपस्थित होते. अनेक वर्षे डोंगरकपारीत राहणाऱ्या आदिवासी बांधवांना गॅस कनेक्शन देऊन ग्रामपंचायतीने त्यांच्या घरात खऱ्या अर्थाने चुली पेटविल्या. खारघर टेकडीवरील चाफेवाडी, फणसवाडी, बेलपाडा वाडी, धामोले वाडीतील एकूण ८९ कुटुंबांना गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले. ग्रामपंचायतीने उचललेले पाऊल कौतुकास्पद असल्याचे उद्गार बाळाराम पाटील यांनी काढले. (प्रतिनिधी)