टॅबचे राजकारण रंगले
By admin | Published: August 4, 2015 02:37 AM2015-08-04T02:37:07+5:302015-08-04T02:37:07+5:30
शाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारा आणि त्यानंतरच टॅब वितरणाचे प्रयोग करा, असा सल्ला देत महापालिकेतील विरोधी पक्षांनी टॅबची खरेदी विद्यार्थ्यांकरिता नाही
मुंबई : शाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारा आणि त्यानंतरच टॅब वितरणाचे प्रयोग करा, असा सल्ला देत महापालिकेतील विरोधी पक्षांनी टॅबची खरेदी विद्यार्थ्यांकरिता नाही तर कंत्राटदारांचे खिसे भरण्याकरिता करण्यात येत असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेच्या टॅबचे गोडवे गायले असतानाच आता विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणाऱ्या टॅबवरून महापालिकेचा आखाडा भलत्याच राजकारणाने रंगू लागला आहे. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेच्या टॅबचे कौतुक केल्याने भाजपाने या प्रकरणी मौन बाळगले आहे.
महापालिका शाळांतील आठवीच्या विद्यार्थ्यांना टॅब देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या टॅबच्या खरेदीचा प्रस्तावही स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला आहे. परंतु सेनेच्या वचननाम्यातील टॅबची खरेदी होण्यापूर्वीच महापालिकेतील विरोधी पक्षांच्या विरोधामुळे राजकीय वातावरण तापले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आठवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांसाठी २२ हजार टॅबची खरेदी केली जाणार आहे. यासाठी पालिका १५ कोटी ६१ लाख रुपये खर्च करणार आहे. तर आगामी शैक्षणिक वर्षांत आठवीच्या विद्यार्थ्यांना टॅब देण्यासाठी १६ कोटी ७६ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. दोन्ही वर्षांसाठी टॅब पुरविण्याचे कंत्राट ‘टेक्नो इलेक्ट्रॉनिक्स’ कंपनीला देण्यात आले आहे. मात्र या टॅब खरेदीवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने आक्षेप घेतला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेच्या टॅबचे कौतुक केल्याने भाजपाने या प्रश्नावर ‘अळीमिळी गुपचिळी’ धोरण स्वीकारले आहे. (प्रतिनिधी)