टिटवाळ्यात फार्महाऊसवर दरोड्याचा प्रयत्न
By admin | Published: November 24, 2015 01:50 AM2015-11-24T01:50:10+5:302015-11-24T01:50:10+5:30
टिटवाळा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या म्हस्कळ रस्त्यावर पितृछाया या फार्महाऊसवर रविवारी रात्री ७ च्या सुमारास दोन दरोडेखोरांनी चोरीच्या उद्देशाने हल्ला केला
टिटवाळा : टिटवाळा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या म्हस्कळ रस्त्यावर पितृछाया या फार्महाऊसवर रविवारी रात्री ७ च्या सुमारास दोन दरोडेखोरांनी चोरीच्या उद्देशाने हल्ला केला. यात त्यांनी रिव्हॉल्व्हरमधून बेछूट गोळीबार केला. त्यात फार्ममालक विलास आचरेकर हे जखमी झाले आहेत.
टिटवाळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरु द्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, टिटवाळा मंदिरापासून हाकेच्या अंतरावर म्हसकळ रस्त्यावर आदिवासी वाडीमागे आचरेकर यांचे पितृछाया नावाचे फार्महाऊस आहे. रविवारी जोराचा पाऊस पडत होता. त्याचाच फायदा घेऊन चोरट्याने तेथे येऊन दरवाजा ठोठावला. त्या वेळी विलास आचरेकर, त्यांची पत्नी व मुलगा असे कुटुंब घरात होते. आम्ही चोरी करायला आलो आहोत, जे पण घरात सोनेनाणे, पैसे असतील तर गुपचूप द्या. आम्ही तुम्हाला काहीच करणार नाही, असे सुनावले. परंतु, त्यांनी दरवाजा उघडला नाही, याचा राग आल्याने त्यांनी हॉल व किचनच्या खिडकीतून सहा गोळ्या झाडल्या. नंतर, परत दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याला छिद्र पाडून आत पाहणी केली. तेवढ्यात आचरेकर यांनी चोरट्यांच्या हातातील बॅटरी खाली पाडली. त्याच वेळी एकाने फायरिंग केली असता आचरेकर यांच्या उजव्या पायाच्या मांडीला गोळी लागून ते जखमी झाले. या वेळी त्यांनी तत्काळ टिटवाळा पोलीस ठाण्यात संपर्क साधला. पंधरा मिनिटांच्या आत पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे कर्मचाऱ्यांना घेऊन घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत चोरट्यांनी तेथून पळ काढला होता. पोलिसांनी घराचे दार उघडले असता आचरेकर कुटुंब पूर्णपणे घाबरले होते. जखमी विलास यांना कल्याण येथील आयुष रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक, ठाणे ग्रामीण अविनाश अंबुरे व उपविभागीय अधिकारी, मुरबाड हरिश्चंद्र व्हटकर घटनास्थळी दाखल झाले होते. या घटनेचा जलद गतीने तपास करून लवकरच अज्ञात चोरट्यांना ताब्यात घेण्यात येईल, असे अविनाश अंबुरे यांनी सांगितले. या प्रकारामुळे लगतच्या गावांतील नागरिकांत व फार्महाऊसमालकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. टिटवाळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.