नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीसाठी जीव्हीके कंपनीची निविदा पात्र ठरली आहे, परंतु राज्य सरकारच्या अंतिम मंजुरीसाठी ही निविदा मागील सहा महिन्यांपासून लालफितीत अडकून पडली आहे. असे असले, तरी गेल्या आठवड्यात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही निविदा स्वीकारण्यात आली असून, पुढील आठवडाभरात त्याला अंतिम मंजुरी दिली जाणार आहे. असे असले, तरी विविध कारणांमुळे विमानतळाच्या कामाला विलंब झाल्याने, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आता विमानाच्या टेकआॅफचा मुहूर्त २0२0 निश्चित करण्यात आला आहे.देशातील पहिले ग्रीनफिल्ड विमानतळ नवी मुंबईत उभारले जात आहे. २६,४४३ हेक्टर जागेवर उभारण्यात येणाºया या प्रकल्पाचा खर्च सुमारे सोळा हजार कोटी रुपयांच्या घरात आहे. या प्रकल्पाला आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे सिडकोने प्रकल्पपूर्व कामाला सुरुवात केली आहे, तसेच विमानतळ उभारणीसाठी जीव्हीके कंपनीची निविदा पात्र ठरविण्यात आली आहे. सुरुवातीला विमानाच्या टेकआॅफचा मुहूर्त डिसेंबर २0१९ निश्चित करण्यात आला होता, परंतु भूसंपादन व पुनर्वसनाचा तिढा, विमानतळाच्या गाभा क्षेत्रातील दहा गावांचे स्थलांतर, विविध मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्तांकडून होणारा विरोध आदी कारणांमुळे या प्रकल्पाचे काम रखडले आहे. आजही प्रकल्पग्रस्तांचा काही प्रमाणात विरोध कायम आहे. असे असतानाही सिडकोने प्रकल्पपूर्व कामाचा धडाका लावला आहे. यात प्रकल्पाला अडथळा ठरणाºया उलवे टेकडीची उंची कमी करणे, नदीचे पात्र बदलणे, विमानतळाच्या प्रस्तावित जागेचे सपाटीकरण, विद्युतवाहिन्या भूमिगत करणे आदी कामांचा समावेश आहे. ही कामे साधारण दीड वर्षे चालणार आहेत. त्यानंतर, धावपट्टी व विमानतळाच्या इमारतीच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. सध्या जीव्हीकेची निविदा मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आले. या महिनाअखेर त्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळेल, असा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे.मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर सदर कंपनीला वित्तीय प्रक्रियेसाठी सहा महिन्यांची मुदत दिली जाईल. त्यानंतर, वर्षभरात नियोजित जागा धावपट्टी व विमानतळाची इमारत उभारणीच्या कामासाठी कंपनीकडे हस्तांतरित केली जाईल, असे सिडकोकडून स्पष्ट करण्यात आले आहे. २0२0 मध्ये विमानाचे टेकआॅफ होईल, या दृष्टीने राज्य सरकार आणि सिडकोने कंबर कसली आहे.
विमानाचे २0२0 मध्येच टेकआॅफ, जीव्हीकेच्या निविदेला लवकरच मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 3:18 AM