योगेश पिंगळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: भाजपचे आमदार गणेश नाईक यांच्याविरोधात बलात्कार आणि धमकी देण्याचा आरोप करणाऱ्या महिलेने आपली तक्रार मागे घेऊन भाजप आमदार मंदा म्हात्रे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी हे सर्व करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप पत्रात केला होता. आता उशिरा का होईना या आरोपाचे खंडन करून पोलिस आणि न्यायालयाच्या माध्यमातून दीपा चौहानांचा बोलावता धनी कोण याचा शोध घेणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी शुक्रवारी परिषदेत दिली. यासाठी चौहान यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी देखील त्यांनी केली.
ही घटना ज्यावेळी घडली त्यावेळी आम्ही महाविकास आघाडीत होतो. कोणाच्याही वैयक्तिक आयुष्यात मी जात नाही. सदर महिला आणि तिचे भाऊ माझ्याकडे मदत मागायला आले होते, असे यावेळी चौगुले यांनी सांगितले. मागचे काही अनुभव पाहता आजच पोलिस उपायुक्तांची भेट घेणार असून त्या महिलेला संरक्षण देण्याची मागणी करणार असल्याचे ते म्हणाले. तिचा बोलवता धनी कोण याची माहिती घेण्यासाठी पोलिस आणि न्यायालयातदेखील जाणार असल्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला. या महिलेची नार्को टेस्ट करण्याच्या मागणीसाठी न्यायालयात जाणार आहे. त्यानंतर सत्य बाहेर येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
५० लाख देणारी ती व्यक्ती कोण
दीपा चौहान यांनी मला व आमदार मंदा म्हात्रेंना बदनाम करण्यासाठी आपल्या तक्रारीमध्ये चुकीच्या पद्धतीने नाव टाकले असल्याचा आरोप चौगुले यांनी यावेळी केला. यावेळी दीपा चौहान यांनी आपली तक्रार मागे घेतल्याचे पत्र पोलिसांना दिल्यानंतर त्यांच्यासोबत झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिपदेखील यावेळी चौगुले यांनी पत्रकारांना ऐकवली. या संवादात आपला फ्लॅट गहाण असून तो सोडविण्यासाठी त्यांनी ५० लाख रुपये दिले आहेत. तसेच केस मागे घेतल्यास ३७ लाख देणार असल्याचे चौहान यांनी म्हटले आहे. मात्र, हे ५० लाख आणि ३७ लाख रुपये देणारी व्यक्ती कोण, मुलास नाव देऊन सेटल करून देणारी व्यक्ती कोण, याचा मात्र संवादात उल्लेख नाही. यामुळे त्याचा शोध घेण्यासाठी ही क्लिप पोलिसांना देणार असल्याच चौगुले म्हणाले.
दूध का दूध आणि पाणी का पाणी होणार
विजय चौगुले यांच्या पत्रकार परिषदेतनंतर आमदार मंदा म्हात्रे पुन्हा आक्रमक झाल्या असून त्यांनी आता विजय चौगुले यांनी पत्रकारांसमोर सादर केलेली ऑडिओ क्लिप ऐकल्यानंतर दूध का दूध आणि पाणी का पाणी होणार आहे. आम्हाला बदनाम करण्याचा कट कोणाचा होता, त्यामागे काय उद्देश होता, हे आता क्लिपद्वारे पोलिस आणि उच्चस्तरीय चौकशीत समोर येणार असल्याचे आ. म्हात्रे म्हणाल्या.