हिट अॅण्ड रन प्रकरणी आरोपीवर कडक कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 01:20 AM2019-06-06T01:20:42+5:302019-06-06T01:20:46+5:30
नागरिकांची मागणी : रहिवाशांनी घेतली पोलीस अधिकाऱ्यांची भेट
नवी मुंबई : पामबीच रोडवर कारने धडक दिल्याने आई व मुलाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली होती. या प्रकरणी आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व कडक कारवाई करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
सीवूड सेक्टर ४८ मधील साईसंगम सोसायटीमध्ये राहणारे अमोल पाटील, त्यांची आई ललिता पाटील व लहान मुलगी चालण्याचा व्यायाम करण्यासाठी गेले होते. या तिघांना कारने धडक दिल्यामुळे अमोलचा जागीच मृत्यू झाला व ललिता यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या घटनेमुळे सीवूड परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात होती. आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणीही केली होती; परंतु बुधवारी आरोपीला जामीन मंजूर झाल्याचे समजल्यामुळे परिसरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. १५ ते २० रहिवाशांनी व प्रत्यक्षदर्शींनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आरोपीची सुटका झाली कशी? विचारणा केली. वेगाने गाडी चालविणाºयामुळे दोघांना जीव गमवावा लागला आहे. संबंधितावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. त्याला जामीन मिळू देऊ नये, अशी भूमिका व्यक्त केली.
साईसंगम सोसायटीमध्ये राहणाºया विजय धावरे यांनी सांगितले की, अपघाताने परिसरातील नागरिकांना धक्का बसला आहे. ही अत्यंत गंभीर घटना आहे. अविचाराने कार चालविणाºयावर कडक कारवाई झालीच पाहिजे, अशी आमची मागणी आहे. आरोपीला सोडून दिल्याचे समजल्यामुळे आम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आमची भूमिका मांडली आहे. प्रत्यक्षदर्शींचा जबाब घेतला जावा व संबंधितांवर कडक कलमांखाली गुन्हा दाखल करावा, अशी भूमिकाही व्यक्त केली आहे. आरोपीवर कडक कारवाई करावी, यासाठी कायदेशीर मार्गाने लढा देण्याचा इशाराही परिसरातील रहिवाशांनी दिला आहे.