बाजार समितीमधील बांगलादेशी कामगारांवर कारवाई करा; नरेंद्र पाटील यांची मागणी
By नामदेव मोरे | Published: September 25, 2024 05:04 PM2024-09-25T17:04:07+5:302024-09-25T17:04:34+5:30
माथाडींच्या हक्कांचे रक्षण करण्याचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये बांगलादेशी कामगार काम करत आहेत. कमी मजूरीत कामगार मिळतो म्हणून व्यापाऱ्यांनी त्यांना आश्रय देवू नये. बांगलादेशी कामगारांवर कारवाई करावी अशी मागणी माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी केली आहे.
बाजार समितीमध्ये आयोजीत कामगार मेळाव्यात नरेंद्र पाटील यांनी माथाडी कामगारांच्या प्रश्नांकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले. बाजार समितीमधील आवक कमी झाली आहे. कामगारांना पुरेसे काम मिळत नाही. त्यांना त्यांच्या हक्कापासून वंचीत ठेवले जात आहे. बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये बांगलादेशी कामगार काम करत आहेत. त्यांना मार्केटमध्ये आश्रय मिळत आहे. बांगलादेशमध्ये तेथील हिंदूंवर अन्याय केला जात आहे. आणि येथे विनापरवाना राहणारांना काम दिले जात आहे. व्यापाऱ्यांनी कमी पैशात कामगार उपलब्ध होतात म्हणून त्यांना आश्रय देवू नये. या कामगारांवर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणीही पाटील यांनी उपमु्ख्यमंत्र्यांकडे केली.
कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी कामगार मंत्री, पणन मंत्र्याना वेळ मिळत नाही, आम्ही जगावे की मरावे अशी स्थिती आहे. माथाडी चळवळीचा दुरूपयोग करणारांवर कारवाई करण्यात यावी. शासनाने प्रस्तावीत केलेला कायदा थांबविल्याबद्दल नरेंद्र पाटील यांनी शासनाचे आभार मानले. पण हा प्रस्तावीत कायदा कायमस्वरूपी खाडीत बुडवून टाकण्याची मागणीही केली. कामगारांच्या हक्काचे संरक्षण करण्याची मागणीही केली.