अतिक्रमणातील दोषींवर कारवाई करा
By admin | Published: February 16, 2017 02:18 AM2017-02-16T02:18:16+5:302017-02-16T02:18:16+5:30
अतिक्रमण प्रकरणात दोषी असणाऱ्या सर्वांवर कारवाई केली जावी, अशी मागणी नगरसेवक मनोहर मढवी यांनी बुधवारी महासभेत केली.
नवी मुंबई : अतिक्रमण प्रकरणात दोषी असणाऱ्या सर्वांवर कारवाई केली जावी, अशी मागणी नगरसेवक मनोहर मढवी यांनी बुधवारी महासभेत केली. आयुक्त हे दुटप्पी धोरण राबवत असून ते फक्त नगरसेवकांची पदे घालवायला बसले आहेत; परंतु मोकाट असलेले भूमाफिया व त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होताना दिसत नसल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.
शहरात अनधिकृत झोपड्यांवर प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईचे पडसाद बुधवारी महासभेत उमटले. या वेळी झोपड्यांवर कारवाई केली जात असताना, भूमाफियांवरच्या कारवाईकडे मात्र प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नगरसेवक मनोहर मढवी यांनी केला. अनधिकृत बांधकामे व झोपड्या रातोरात उभ्या राहत नसून, त्यामध्ये संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचेही हात गुंतलेले आहेत. भूमाफियांनी जागा बळकावून त्यावर उभारलेल्या झोपड्या गरिबांना विकल्या आहेत. अशा भूमाफियांवर गुन्हे दाखल करून अधिकाऱ्यांचीही चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी त्यांनी केली. तर अशाप्रकारचे न्यायालयीन आदेश दिघा प्रकरणात प्रशासनाला प्राप्तही झालेले आहेत. त्यानंतरही अद्याप एकाही अधिकाऱ्यावर कारवाई झाल्याचे दिसत नाही. यामुळे फक्त नगरसेवकांची पदे घालवायला ते बसलेत का? असा टोलाही त्यांनी मारला. झोपड्या अनधिकृत असल्याचे माहीत असतानाही, त्या ठिकाणी वीज, पाणी कसे पोहोचते? असा प्रश्न उपस्थित करत, अधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय हे शक्य नसल्याचे ते म्हणाले. यामुळे अतिक्रमणाला अधिकारीच जबाबदार असून तत्कालीन विभाग अधिकाऱ्यांचे ब्रेन मॅपिंग होण्याचीही गरज त्यांनी व्यक्त केली. शिवाय यामध्ये नगरसेवकही दोषी असल्यास त्यांच्यावरही कारवाई करावी; परंतु आयुक्तांचे धोरण दुटप्पी असल्याची खंतही त्यांनी सभागृहात व्यक्त केली. तर कारवाईमध्ये झोपडीधारकांकडे माणुसकी म्हणून पाहण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. या वेळी नगरसेवक प्रशांत पाटील यांनी घणसोली सेक्टर १ व परिसरातील रो हाऊसमधील अनधिकृत बांधकामांवर कारवाईची मागणी केल्याचे सांगितले; अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी अतिक्रमण प्रकरणात सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. (प्रतिनिधी)