घे पंगा खेळाचा, कर दंगा विजयाचा ! नमो चषक 2024 व सांस्कृतिक क्रीडा महोत्सवांचा शुभारंभ
By नारायण जाधव | Published: January 13, 2024 03:15 PM2024-01-13T15:15:11+5:302024-01-13T15:15:41+5:30
या फुटबॉल स्पर्धेमध्ये एकूण 56 संघांनी भाग घेतला असून त्यात महिला व पुरुष असे दोन गट या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत.
नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या "नमो चषक 2024"चे (फुटबॉल स्पर्धेचे) उद्घाटन आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या शुभहस्ते शनिवारी डॉन बॉस्को स्कुल, सेक्टर-42, नवी मुंबई येथे मोठ्या जल्लोषात पार पडले. यावेळी आमदार म्हात्रे प्रसारमांशी बोलतांना पुढे म्हणाल्या की, काल नमो चषकाचा शुभारंभ हा महाराष्ट्रामधील नाशिक शहरात झाला असून आज नवी मुंबईमधील 151 बेलापूर विधानसभामध्ये माजी नगरसेवक भरत जाधव व त्यांचे सहकारी यांच्या माध्यमातून पंढरपूर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून भीमा नदीच्या काठावर वसलेले विठ्ठल रुक्मिणी मंदिर भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र असून विठ्ठल रुक्मिणीची थाटामाटात पालखी काढून स्पर्धेची सुरुवात केली.
तसेच या नमो चषक 2024 मध्ये विविध प्रकारच्या खेळाचा समावेश करण्यात आला असून त्यात बुद्धिबल, कॅरम, नृत्य, गायन, वेशभूषा, कुस्ती, वक्तृत्व स्पर्धा, 100 मी धावणे, 400 मी धावणे, कबड्डी, कुस्ती, क्रिकेट, मेहंदी, पाककला, चित्रकला अशा विविध अनेक स्पर्धा या नमो चषकाच्या माध्यमातून तरुणांना व विद्यार्थ्यांना खेळण्यास मिळणार आहे. तसेच या फुटबॉल स्पर्धेमध्ये एकूण 56 संघांनी भाग घेतला असून त्यात महिला व पुरुष असे दोन गट या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत.
तसेच त्या पुढे म्हणाल्या की, नमो चषकाच्या माध्यमातून "सुदृढ भारत, निरोगी भारत" राहो अशी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना राहीली आहे, आणि नेहमीच त्यांच्या माध्यमातून भविष्यातील भारत घडवण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत. त्यात खेळाला महत्व नसून या खेळाच्या माध्यमातून लोकांना जोडणं, त्यांच्याशी संवाद साधने, त्यांच्या तब्येतेची काळजी घेणे असे असून या फूटबॉलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शरीर निरोगी राहते त्याच बरोबर त्यांच्या शाळेचे नाव ही उंचावते. या नमो चषकाच्या माध्यमातून बेलापूर मतदारसंघातील तब्बल 50 हजार खेळाडू जोडणार असून बेलापूर विधानसभा क्षेत्रामधील खेळाडूंना एक व्यासपीठ निर्माण होणार आहे.
तसेच एकंदरीत सिबिडी-बेलापूर येथे 10 दिवस विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी नवी मुंबईकरांना अनुभवयास मिळणार आहे. सदर स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी आपली नाव नोंदणी https:namochashak.in या लिंक वर जाऊन नोंदणी करून घेण्याचे आवाहन म्हात्रे यांनी केले आहे.
यावेळी माजी जिल्हाध्यक्ष भगवान ढाकणे, माजी नगरसेवक तथा बेलापूर विधानसभा संयोजक निलेश म्हात्रे, माजी नगरसेवक दीपक पवार, नगरसेविका कविता जाधव, भाजपा उत्तराखंड समाज अध्यक्ष हेम पांडे, आदित्य जाधव, रणजित निंबाळकर, अज्जू कदम, सिद्धेश कावले, सुरेश कुमार, रोहन पवार, गणेश कोनार, दिलीप चव्हाण, योगेश कावले व कार्यकर्ते उपस्थित होते.