नवी मुंबई : अक्कलकोट तालुक्याला उजनीचे पाणी देण्यात यावे या मागणीसाठी अक्कलकोटमधील तरुणांनी मंत्रालयापर्यंत स्वाभिमान पदयात्रेचे आयोजन केले आहे. आंदोलकांचे गुरुवारी नवी मुंबईमधील विविध राजकीय व सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत करून त्यांच्या मागणीला पाठिंबा दिला.अक्कलकोटमधील पानमंगरूळ येथून ७ सप्टेंबरला ही पदयात्रा सुरू झाली आहे. किरण गवंडी, महेश मल्लिकार्जुन कटारे हे या पदयात्रेमध्ये सहभागी झाले आहेत. उजनीचे पाणी अक्कलकोट तालुक्यासाठी कोणतीच सिंचनाची योजना नाही. यामुळे तालुक्याचा विकास होत नाही. रोजगारासाठी तरुणांना तालुक्याबाहेर जावे लागत आहे. उजनीचे पाणी अक्कलकोटसाठी मिळाले तर सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी पदयात्रा सुरू केली आहे.आंदोलकांचे सानपाडामध्ये स्वागत करण्यात आले. शिवसेनेचे माजी नगरसेवक विजयानंद माने, तुर्भे विभाग प्रमुख दीपेश शिंदे, काँग्रेसचे बाळकृष्ण खोपडे, शेतकरी कामगार पक्षाचे गोविंद साळुंखे, प्रशांत शेलार, अजिंक्य चौगुले, दिलीप वाघमारे यांनीही त्यांची भेट घेऊन आंदोलकांना पाठिंबा दिला. शुक्रवारी आंदोलक मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहेत.
रक्त घ्या पण आम्हाला पाणी द्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 12:24 AM