लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : रोजच्या कामाचा ताण व इतर कारणांनी पोलिसांचे प्रकृतीकडे होणारे दुर्लक्ष टाळण्यासाठी थेट पोलिस ठाण्यातच जिम व बॅडमिंटन कोर्टची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. महापालिकेच्या सहकार्याने सीबीडी पोलिस ठाण्याच्या आवारात हा अभिनव प्रकल्प राबवण्यात आला आहे. पोलिस ठाण्यालगतचे भंगार हटवल्यानंतर तिथली जागा अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपयोगी आणली आहे.
पोलिसांनी विविध गुन्ह्यात, अपघातांमध्ये तसेच इतर कारणांनी जप्त केलेली वाहने व इतर साहित्य पोलिस ठाण्याच्या आवारातच साठवले जाते. यामुळे पोलिस ठाण्याची शोभा जात असते. बहुतांश पोलिस ठाण्याला याच कारणामुळे अवकळा आली आहे. त्यावर पर्याय म्हणून पोलिस ठाण्याच्या आवारातील जप्तीतली भंगार वाहने तळोजा येथे जमा करण्यास सुरवात झाली आहे. यामुळे सीबीडी पोलिस ठाण्याच्या आवारातील जप्तीतली वाहने हटल्याने जागा मोकळी झाली होती. या जागेचा पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्या उपयुक्त वापर करण्याची संकल्पना वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीधर गोरे यांनी पालिका अधिकाऱ्यांकडे मांडली होती. त्यानुसार तिथे ओपन जिम उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याशिवाय काही दिवसांपूर्वी तिथल्याच जागेत बॅडमिंटन कोर्ट देखील तयार करण्यात आले आहे. त्याचे उदघाटन पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या हस्ते सह आयुक्त संजय येनपुरे, उपायुक्त पंकज डहाणे, तिरुपती काकडे आदींच्या उपस्थितीत करण्यात आले.
बॅडमिंटन कोर्ट व ओपन जिम यामुळे पोलिसांना कामाच्या ठिकाणीच थोडाफार मिळालेला वेळ स्वतःच्या प्रकृतीसाठी देखील देता येणार आहे. कामाचा ताण असह्य होऊन पोलिसांना हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रकार घडत आहेत. अशा प्रसंगावर मात करणारी करणारी हि संकल्पना ठरू शकते. शिवाय पोलिस ठाण्याच्या भिंतींना देखील समाजउपयोगी संदेशाचे माध्यम बनवण्यात आले आहे. यामुळे पोलिस ठाण्याचे रूप देखील पालटले आहे. येत्या काळात हि संकल्पना इतरही पोलिस ठाण्यात राबवली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पोलिस आयुक्तालयाच्या परिसरातल्या अनेक समस्या निकाली काढून रुपडे बदलले आहे. त्यातच पोलिस ठाण्याचाही चेहरा मोहरा बदलला जात असल्याचे समाधान पोलिस कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.