कधीही घ्या निवडणुका, भाजपा तयार
By Admin | Published: April 3, 2017 03:25 AM2017-04-03T03:25:13+5:302017-04-03T03:25:13+5:30
राजकीय पक्षांच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे पनवेल महापालिका निवडणूक नेमकी कधी होणार? याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
पनवेल : राजकीय पक्षांच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे पनवेल महापालिका निवडणूक नेमकी कधी होणार? याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भाजपाने जूनमध्ये निवडणूक घ्यावी, अशी मागणी केली आहे. मात्र, काही लोकांना घाई झाली आहे. एप्रिल किंवा जूनमध्ये निवडणूक घ्या, त्यासाठी भाजपा तयार आहे, असे स्पष्ट मत माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केले आहे.
येथील मार्केट यार्डमधील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. ६0 ते ७0 टक्के हरकतींवर प्रशासनाने काम पूर्ण केले आहे. मतदार याद्यांच्या घोळाबाबत न्यायालयात जाणार नसल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. मात्र, मतदार यादीचा घोळ जाणीवपूर्वक तयार केला जात असल्याचा संशय त्यांनी या वेळी व्यक्त केला. पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपा-आरपीआय युती तयार आहे. शिवसेनेसोबतच्या युतीबाबत आम्ही चर्चेला तयार आहोत. यासंदर्भात शिवसेनेच्या संबंधित नेत्यांशी चर्चा झाली आहे. ते सोबत आले तर त्यांच्यासोबत, अन्यथा स्वबळावर भाजपा लढण्यास तयार असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. येत्या आठ ते दहा दिवसांत भाजपा उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याचे संकेतही त्यांनी या वेळी दिले. भाजपा ही निवडणूक विकासात्मक दृष्टिकोन ठेवून लढणार आहे. शिक्षण, सामाजिक कार्य, राजकीय कार्य, जनसंपर्क या निकषावर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून झालेली विकासकामे संपूर्ण पनवेलच्या जनतेला माहीत आहेत. त्यामुळे विरोधकांच्या भूलथापांना जनता बळी पडणार नाही, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला. या वेळी भाजपाचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, तालुकाध्यक्ष अरूणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा सरचिटणीस अविनाश कोळी उपस्थित होते. (वार्ताहर)
>अन्यथा स्वबळावर लढू
निवडणुकीसाठी भाजपा -आरपीआय युती तयार आहे. शिवसेनेसोबतच्या युतीबाबत आम्ही चर्चेला तयार आहोत. शिवसेनेच्या संबंधित नेत्यांशी चर्चा झाली आहे. ते सोबत आले तर त्यांच्यासोबत, अन्यथा स्वबळावर भाजपा लढण्यास तयार आहोत.