कळंबोली : कळंबोली, कामोठे शहराला जोडणारा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने बंद केला आहे, त्यामुळे कळंबोलीकरांना कामोठे तसेच रेल्वेस्थानकात जाण्यासाठी कळंबोली शहराला वळसा घालून जावे लागत आहे. त्यामुळे वेळ व इंधन वाया जाते. ही गैरसोय दूर व्हावी, यासाठी कळंबोलीतील काही सामाजिक संस्थेसह नागरिक एकवटले आहेत. त्यांनी रस्ता चालू करावा, यासाठी स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली. या बाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला तसे पत्रही दिले असून लवकरच उपाययोजना केल्या जातील, असे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.
पनवेल-सायन महामार्गावर कामोठे ते कळंबोली वसाहतीत जाण्याकरिता शॉर्टकट रस्ता तयार करण्यात आला होता. या रस्त्यावरून दुचाकी व चारचाकी वाहने ये-जा करतात. कळंबोली वसाहतीत जाण्यासाठी सायन-पनवेल महामार्गावरून अर्धा किमी पुढे पुढे जाऊन शिवसेना शाखेसमोरून वसाहतीत जावे लागते. या ठिकाणी वारंवार होणारी वाहतूककोंडी व कळंबोली शहराला वळसा वाचवण्यासाठी हा शॉर्टकट सोईस्कर होता; परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित रस्ता बेकायदा ठरवत बंद केला आहे, त्यामुळे कळंबोलीकरांना कामोठे रेल्वेस्थानक तसेच कामोठे शहरात जाण्याकरिता अर्धा किमीचा वळसा घालावा लागतो. त्याचबरोबर कळंबोली मॅकडोनाल्ड परिसरात जाण्यासाठी महामार्गावरून रस्ता देण्यात आला आहे. मात्र, हा रस्ता वैध कसा, असा प्रश्न कळंबोलीकरांकडून उपस्थित होत आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने रविवारी पाहणी करण्यात आली असून लवकरच उपाययोजना केल्या जातील, असेही सांगण्यात आले आहे.स्वाक्षरीची मोहीम : कळंबोली ते कामोठे रस्ता चालू करण्यासाठी काही सामाजिक संस्था तसेच नागरिकांनी एकत्र येऊन शनिवारी स्वाक्षरी मोहीम राबवली. त्यात जवळपास एक हजार सह्यांचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले आहे.