शिक्षकांच्या कुटुंबीयांना अनुकंपा तत्त्वावर सेवेत घ्या
By admin | Published: July 25, 2015 01:43 AM2015-07-25T01:43:21+5:302015-07-25T01:43:21+5:30
राज्यातील अनुदानप्राप्त संस्थांमधील सेवेत असलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांतील एका व्यक्तीस
मुंबई : राज्यातील अनुदानप्राप्त संस्थांमधील सेवेत असलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांतील एका व्यक्तीस अनुकंपा तत्त्वावर सेवेत सामावून घेण्याचे आदेश आहेत. मात्र त्याची अंमलबजावणी करण्यास शिक्षणाधिकारी टाळाटाळ करत असल्याचा आरोप शिक्षक परिषदेने केला आहे. परिणामी शिक्षक कुटुंबीयांची वाताहत होत असून आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी परिषदेने केली.
याबाबत अधिक माहिती देताना परिषदेचे मुंबई उत्तर विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे म्हणाले, आदेशाचे पालन होत नसल्याने अनेक कुटुंबे निराधार झाली आहेत. या संदर्भात विधान परिषदेत शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करून कार्यवाही करण्याची मागणी केली. त्यावर सभापतींनी तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. ठाणे जिल्ह्यात सुमारे ४५ प्रकरणे गेल्या ८ वर्षांपासून प्रलंबित असल्याची माहिती मोते यांनी दिली. ते म्हणाले, राज्यभर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची याहून भीषण परिस्थिती आहे. काही कुटुंबीयांकडून अधिकारी अनुंकपा तत्त्वावर नोकरी देण्यासाठी लाच घेत असल्याचा आरोपही मोते यांनी केला. (प्रतिनिधी)