तलाठी कार्यालय बंद असल्याने नागरिकांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 11:00 PM2020-02-25T23:00:24+5:302020-02-25T23:00:27+5:30
वारे गावातील प्रकार; सात महसुली गावांचा समावेश
नेरळ : कर्जत तालुक्यातील वारे येथील महसूल विभागाचे कार्यालय मागील दोन वर्षांपासून बंद करण्यात आले आहे. परिणामी, तलाठी कार्यालयात येणाऱ्या शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. येथील तलाठी कार्यालयाविना असून, वारे येथील तलाठी कार्यालय त्वरित सुरू करण्याची मागणी केली जात आहे.
वारे तलाठी सजाअंतर्गत वारे, पोशीर, मानकीवली, देवपाडा, पोही, कुरुंग, चिंचवाडी या सात महसूल गावांसह परिसरातील वाड्या-पाड्या येतात. वारे येथील तलाठी कार्यालय या भागातील शेतकºयांना सोयीचे होते. मात्र, दोन वर्षांपूर्वी वारे गावातील एका खासगी जागेत असलेले कार्यालय, इमारत मोडकळीस आल्याने हे कार्यालय तेथून हलविण्यात आले आणि ग्रामपंचायत कार्यालयाजवळील जिल्हा परिषदेच्या बंद अवस्थेत आलेल्या वर्गखोलीत तलाठी कार्यालय सुरू करण्यात आले.
मागील वर्षी अतिवृष्टीत रायगड जिल्हा परिषद वारे शाळेच्या इमारती धोकादायक अवस्थेत आल्याने तलाठी कार्यलयास दिलेली जागा पुन्हा शालेय विद्यार्थ्यांसाठी मोकळी करण्यात आली. तेव्हापासून वारे येथील तलाठी कार्यालय कळंब हलविण्यात आले आहे.
दुर्गम भागातील शेतकºयांना सात-आठ किलोमीटरची पायपीट करून तलाठी कार्यालय गाठावे लागते. शेतीचा सातबारा उतारा, विविध दाखले, शैक्षणिक दाखले, ज्येष्ठ नागरिकांचे दाखले कार्यालयातूनच दिले जात असल्याने आता नागरिकांची गैरसोय होत आहे.
वर्षभरापासून वारे येथील कार्यालय जागेअभावी बंद आहे. सध्या कळंब येथील कार्यालयातून कामकाज सुरू आहे. आम्ही वारे येथे कार्यालय पुन्हा सुरू व्हावे यासाठी प्रयत्न करत आहोत. जागा उपलब्ध करून देण्याकरिता ग्रामसभेत निवेदन दिले आहे.
- व्ही. बी. मिरगणे, तलाठी, सजा वारे