जिल्ह्यातील तलाठी कार्यालये बंद

By admin | Published: November 17, 2016 05:58 AM2016-11-17T05:58:43+5:302016-11-17T05:58:43+5:30

तालुक्यातील १८ तलाठी कार्यालयांना कुलूप ठोकण्यात आले आहे.

The talathi offices are closed in the district | जिल्ह्यातील तलाठी कार्यालये बंद

जिल्ह्यातील तलाठी कार्यालये बंद

Next

जिल्ह्यातील तलाठी कार्यालयेबंद
श्रीवर्धन : तालुक्यातील १८ तलाठी कार्यालयांना कुलूप ठोकण्यात आले आहे. तालुक्यातील १५ तलाठी व १ मंडळ अधिकारी बुधवार, १६ नोव्हेंबरपासून बेमुदत संपात सामील झाले आहेत. आता जोपर्यंत मंत्रालय पातळीवर तलाठ्यांच्या मागण्यांबाबत निर्णय होत नाही, तोपर्यंत तलाठी सामुदायिक रजेवर राहणार आहेत. आता केंद्र सरकारने ५०० व १ हजारच्या नोटा चलनातून बाद केल्यामुळे सर्वांनी बँकांमध्ये धाव घेतली आहे. सध्या तलाठ्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यायला कुणालाही वेळ नाही. तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी १० नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत खासदार, पालकमंत्री, विरोधी पक्षनेते, आमदार यांना निवेदने दिली. मात्र, एकाही लोकप्रतिनिधीने तलाठ्यांच्या मागण्यांचा विचार केलेला नाही. त्यामुळे त्यांना संपाचे हत्यार उपसावे लागले आहे.
तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी काळ्या फिती लावून काम केले. ७ नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयासमोर निदर्शने केली. १० नोव्हेंबर रोजी अतिरिक्त कार्यभाराच्या चाव्या तहसीलदारांकडे जमा केल्या. १० नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत आपल्या मागण्या लोकप्रतिनिधींच्या कानावर घातल्या. एवढे करूनही शासनाला जाग येण्यासाठी कामकाज थांबवले, आता तरी शासन मागण्यांचा विचार करेल, अशी अपेक्षा तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना आहे. ३ नोव्हेंबरपासून आंदोलनाचे टप्पे १४ नोव्हेंबरपर्यंत पार पाडूनही आपल्या मागण्यांकडे सरकारने लक्ष न दिल्यामुळे बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय तलाठ्यांनी घेतला आहे. आता मागण्या मान्य झाल्याशिवाय संप मागे घेणार नाही, असा इशारा महासंघाने दिला आहे. (वार्ताहर)
प्रमुख मागण्या
च्तलाठी सजाची व महसूल मंडळाची पुनर्रचना करा, ७/१२ संगणकीकरण व ई- फेरफारमधील अडचणी सोडवा, सर्व्हर स्पीड करा, सॉफ्टवेअरमधील अडचणी दूर करा, लॅपटॉप व प्रिंटर पुरवा, तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना पायाभूत प्रशिक्षण द्या, अवैध गौण खनिज वसुली या कामातून तलाठी संवर्गास वगळा, तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालय बांधून द्या, मंडळाधिकाऱ्यांना कार्यालयीन भाडे मंजूर करा, महसूल खात्यात पदोन्नतीसाठी द्विस्तरीय पद्धतीचा अवलंब करा, सरळ सेवेची २५ टक्के पदे खात्याअंतर्गत कर्मचाऱ्यांसाठी राखून ठेवा आदी विविध मागण्या आहेत अशी माहिती मंडळ अधिकारी बी.टी.बुर्शे यांनी दिली आहे.
महाड तालुक्यातील १८५ गावांचे महसुली कामकाज ठप्प
 दासगाव/महाड : वेळोवेळी शासनाकडे मागण्या करून देखील शासनाने तलाठ्यांच्या मागण्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळे बुधवारपासून राज्यातील सर्व तलाठ्यांबरोबर महाड तालुक्यातील १८५ गावांचे ३६ तलाठी तसेच मंडल अधिकारी बेमुदत संपावर गेले आहेत. मात्र संपावर जाण्याअगोदर १० नोव्हेंबर रोजी डीएससी डीवायएस, तसेच कार्यालयाच्या कपाटाला तसेच कार्यालयाला लॉक लावून त्यांच्या चाव्या महाड तहसीलदारंकडे जमा केल्या आहेत. मात्र या संपामुळे पुन्हा नागरिकांना नोटांच्या संकटाबरोबर दुसऱ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. महाड तालुक्यात ३६ तलाठी सजा आहेत, तसेच ६ मंडल अधिकाऱ्यांची नेमणूक आहे. राज्यातील सर्व तलाठ्यांच्या अनेक समस्या प्रलंबित आहे. अनेक वर्षांपासून तलाठी संघटना शासनाकडे समस्या दूर करण्यासाठी भांडत आहे. मात्र शासन याकडे दुर्लक्ष करत आहे.
अलिबागमध्ये तलाठी संपावर
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील तलाठी बुधवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. तलाठ्यांच्या संपामुळे ग्रामीण भागातील प्रशासकीय व्यवहारांना चांगलीच खिळ बसली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तलाठ्यांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. सातत्याने पाठपुरावा करूनही सरकारने आश्वासनांची खैरातच दिली आहे. त्यामुळे बेमुदत संपाचे हत्यार उपसावे लागल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
तलाठी यांच्या संपामुळे ग्रामीण भागातील प्रशासकीय कामे थंडावणार आहेत. फेरफार उतारे, वारस नोंद, सात बारा उतारा देणे, त्याची नोंद करणे, मालमत्ता कर यासह अन्य १८ विविध कामे रखडणार आहेत. त्याचा नाहक त्रास सर्वसामान्य शेतकरी, नागरिकांना होत आहे. तलाठ्यांच्या संपावर लवकरात लवकर तोडगा न निघाल्यास नागरिकांच्या त्रासामध्ये चांगलीच भर पडणार आहे.

 

Web Title: The talathi offices are closed in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.