सुटीचा मुहूर्त साधून इच्छुकांनी साधला मतदारांशी संवाद
By admin | Published: April 24, 2017 02:39 AM2017-04-24T02:39:37+5:302017-04-24T02:39:37+5:30
पनवेल महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतरच्या पहिल्याच रविवारी उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटीवर भर दिला. प्रत्येक प्रभागात
नितीन देशमुख / पनवेल
पनवेल महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतरच्या पहिल्याच रविवारी उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटीवर भर दिला. प्रत्येक प्रभागात पक्षाचे कार्यकर्ते व उमेदवार फिरताना दिसत होते. शनिवार व रविवारच्या सुटीचा पुरेपूर वापर प्रचारासाठी कार्यकर्ते करताना दिसत होते.
शाळांना सुटी लागल्याने अनेक जण गावी अथवा फिरायला जाण्याच्या विचारात आहेत. अशा चाकरमान्यांची भेट घेऊन मतदानासाठी प्रोत्साहित करण्यावर उमेदवार भर देत आहेत. तर कार्यकर्ते गावी गेलेल्या मतदारांशी संपर्क साधून २४ मे रोजी मतदारासाठी आवर्जून येण्याचे आवाहन करीत आहेत.
पनवेल महानगरपालिकेसाठी २० प्रभागातून ७८ नगरसेवक निवडून द्यावयाचे आहेत. शेकापक्ष, राष्ट्रवादी व काँग्रेस यांनी महाआघाडी केली आहे. भाजपा व सेना यांच्यात अद्याप युती झालेली नाही. याठिकाणी मनसेची ताकद नगण्यच आहे.
सुट्या लागल्याने बाहेरगावी जाणाऱ्या मतदारांना रोखण्यासाठी पक्षांकडून भेटीगाठींवर भर दिला जात आहे. शेकापची मदार ग्रामीण मतदारांवर असल्याने २४ मे रोजी निवडणूक जाहीर होताच त्यांना जास्त आनंद झाला.
रायगड जिल्ह्यातील पहिल्या महापालिकेत आपलाच उमेदवार महापौर व्हावा, यासाठी भाजपाने व्यूहरचना तयार केली आहे. त्यासाठी सुरुवातीला युवा नेता परेश ठाकूर यांचे नाव पुढे होते. मात्र महापौरपद महिला आरक्षित झाल्याने पुन्हा शोधमोहीम सुरू झाली आहे. याशिवाय मतदार यादीत झालेल्या घोळाचाही भाजपाला फटका बसण्याची शक्यता आहे. नवीन आयुक्तांनी मतदार याद्या दुरुस्तीचे आश्वासन दिले असले तरी अद्याप सुधारित याद्या प्रसिध्द न झाल्याने मतदारांमध्ये नाराजी आहे. याचा परिणाम मतदानाच्या टक्क्यावर होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
प्रभाग १७ मध्ये मतदार यादीत अनेक घोळ असल्याचे वकील संघटनेचे अध्यक्ष मनोज भुजबळ यांनी दाखवून दिले. त्याबाबत त्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या प्रभागातील एका वकिलाने आपले नाव राहत असलेल्या प्रभागात नसून दुसऱ्या प्रभागात असल्याबद्दल न्यायालयात दाद मागितली आहे. माजी उपनगराध्यक्षांच्या घरातील मते ही विभागली गेली आहेत. त्यामुळे या प्रभागातील भाजपाचे उमेदवार मनोज भुजबळ शनिवार व रविवार कडक उन्हात घरोघर फिरून जास्तीत मतदारांजवळ संपर्क साधण्याचा प्रयत्न करताना दिसत होते.